अंबाजोगाई

स्त्री व पुरुष हे प्रथमतः मानव आहेत त्यांना त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी अवकाश दिला गेला पाहिजे – प्रा. अरुंधती पाटील* *मनस्विनी महिला विकास प्रकल्प व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने अंबाजोगाई बस आगारात लैंगिक छळ या विषयी कार्यशाळा संपन्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- समाजातील स्त्री व पुरुष हे प्रथमतः मानव असून त्यांना त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी अवकाश मिळायलाच हवा असे प्रतिपादनजेष्ठ समाजसेविका तथा मनस्विनी महिला सेवाभावी संस्थेच्या समन्वयक प्रा अरुंधती पाटील यांनी केले. त्या अंबाजोगाई शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगरामध्ये आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ (प्रतिबंध मनाई व निवारण या विषयावर) कार्यशाळेत बोलत होत्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई बस आगाराचे प्रमुख अमर राऊत व वाहतूक निरीक्षक धोंडीबा पल्लेवाड, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मिठू खाडे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार ,सचिव विष्णू सरवदे उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभ दीपप्रज्वलन करून आगार प्रमुख व इतर मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले.सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केले. आपले सविस्तर विवेचनाची सुरुवात प्रा. अरुंधती पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ प्रतिबंध मनाई व निवारण या विषयावर उपस्थित महिलांना विविध प्रश्न विचारतच सुरुवात केली. याप्रसंगी विविध चित्रफितीच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांनी व मुलींनी सुरक्षितता कशा प्रकारे बाळगावी याविषयी सविस्तर पणे मार्गदर्शन केले. आजच्या या दोन तासाच्या कार्यशाळेमध्ये वरील विषया संबंधी असे कायदे करण्याची गरज का भासली यावर देखील चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर स्त्रिया आणि पुरुष या प्रथम माणूस आहे आणि माणूस म्हणूनच त्यांना त्यांच्या क्षमतां विकसित करण्यासाठी अवकाश दिला गेला पाहिजे असे परखड मत प्रा पाटील यांनी मांडले.
स्त्री व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषमता होऊ नये, मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहुन करीअर घडवित असतांना कामाच्या ठिकाणी स्नेहपूर्ण असे वातावरण असायला हवे व तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी तेथील सर्व पुरुष आणि स्त्रिया या दोघांची असल्याची भावना याप्रसंगी प्रा अरुंधती पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्यामध्ये सामंजस्य पूर्ण संबंध निर्माण झाले तरच त्याठिकाणी अधिक गतीने कार्य होऊ शकते अशा प्रकारचे सविस्तर मार्गदर्शन प्रा. अरुंधती पाटील यांनी सदरील कार्यशाळेत केले.
कार्यशाळेच्या शेवटी शिक्षक मैत्रीचे सचिव विष्णू सरवदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास अंबाजोगाई बस आगारातील सर्व महिला व पुरुष कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी मनस्विनीच्या अंजली कोदरकर व शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अशोक पोपळघट यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!