तीन देवस्थानांच्या विकासासाठी आ. नमिता मुंदडांच्या प्रयत्नांमुळे सव्वा दहा कोटींचा निधी मंजूर
अंबाजोगाई प्रतिनिधी – आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे केज विधानसभा मतदार संघातील तीन ‘ब’ वर्ग देवस्थानांच्या विकास कामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून १० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मतदार संघातील केज तालुक्यातील दोन आणि बीड तालुक्यातील एका देवस्थानाची विकासाकामे करण्यात येणार असल्याची माहिती आ. मुंदडा यांनी दिली.
केज मतदार संघात अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. या देवस्थानांचा वाढता प्रसार लक्षात घेता या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले होते. मागील वर्षभरात आ. नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील देवस्थानांच्या विकास कामांसाठी तीन टप्प्यात एकूण १५ कोटी रुपयांचा मंजूर करून आणला होता. त्यानंतर उर्वरित देवस्थानांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आ. मुंदडा यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्राम विकास विभागकडून केज मतदार संघातील तीन देवस्थानांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा व विकासकामे करण्यासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून १० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केज तालुक्यातील कुंबेफळ येथील श्री क्षेत्र सिद्धिविनायक देवस्थानासाठी ३ कोटी रुपये, तांबवा येथील श्री क्षेत्र तांबवेश्वर देवस्थानासाठी ४ कोटी २५ लाख रुपये आणि बीड तालुक्यातील नेकनूर येथील श्री संत बंकटस्वामी देवस्थानासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपलब्ध निधीमुळे या तिन्ही देवस्थानांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळणार असल्याने भाविक भाविक भक्तातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. देवस्थानांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.