प्रियदर्शनी क्रीडा मंडळ व रोटरॅक्ट क्लब च्या वतीने दांडिया महोत्सवाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले– सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर
*नवरात्रोत्सवानिमित्त नारीशक्तीचा सन्मान व जागर होण्यासाठी अंबाजोगाई दांडिया महोत्सवाचे आयोजन – संकेत मोदी*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रोट्रॅक्ट क्लब यांच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील महिला व मुलींसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचा अभिमान सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांनी व्यक्त केला. या महोत्सवात आपल्या मातीची नाळ व मातीचा सुगंध अनुभवयास मिळाल्याचे अभिनेते हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी स्पष्ट केले.ते प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रोट्रॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दांडिया महोत्सव- २०२४ या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अक्षया देवधर यांचे पती तथा सुप्रसिद्ध अभिनेते तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी (राणादा), मुख्य संयोजिका सुनीता मोदी, डिंपल मोदी, डॉ. सुनीता बिराजदार, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. अर्चना थोरात, डॉ. राजश्री धाकडे,मनीषा पवार, शोभा खडकभावी , प्रा सविता बनाळे या उपस्थित होत्या. हा दांडिया महोत्सव ९ ते ११ ऑक्टोबर या दरम्यान संपन्न झाला.
महोत्सवाची सुरुवात माता श्री योगेश्वरी व माता दुर्गा यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत मोदी यांनी केले . महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून थोडीशी उसंत मिळून या दांडिया उत्सवाच्या माध्यमातून त्यांना मानसिक व आध्यात्मिक आनंद लाभावा त्याचबरोबर नवरात्रोत्सवात नारीशक्तीचा मान सन्मान व्हावा या उद्देशाने केवळ महिलांसाठी हा उत्सव आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.या दांडिया महोत्सवात ४०० च्या वर मुली, महिला व जोड्या(कपल) यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपला पास घेऊन सहभाग घेतला होता. या तीन दिवसीय दांडिया महोत्सवात दरदिवशी २० महिला स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली याप्रमाणे ६० स्पर्धकांच्या अंतिम फेरीतून उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट जोडी व उत्कृष्ट स्पर्धक अशी निवड करण्यात आली. दररोज नऊ महिलांना पैठणी व सन्मानचिन्ह देण्यात आले. अंतिम फेरीतील विजेत्या स्पर्धकांना एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन व वॉटर हिटर अशा बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ सुनीता बिराजदार, डॉ अर्चना थोरात व डॉ राजश्री धाकडे तसेच मनीषा पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.या दांडिया महोत्सवाची रंगीलो गुजरात अशी थीम ठेवण्यात आली होती. यामुळे गुजराती घरांची प्रतिकृती, महिलांसाठी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आले होते.
याप्रसंगी दांडिया महोत्सवात सहभागी महिलांशी बोलताना अक्षया देवधर म्हणाल्या की मी आज पर्यंत अनेक नवरात्रोत्सव मोठ-मोठ्या शहरात पाहिले, अनुभवले परंतु आज पर्यंतच्या नवरात्रोत्सवापेक्षा अतिशय आगळा वेगळा व मातीचा आनंद, सुगंध असलेला हा नवरात्रोत्सव जो की, प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ व रोटरॅक्ट च्या वतीने खास अंबाजोगाई शहरातील महिला भगिनींसाठी आयोजीत केलेला हा दांडीया महोत्सव काही औरच व दिमाखदार असा दिसुन आल्याचे अक्षया देवधर यांनी नमूद केले. प्रियदर्शनी मंडळाचे संकेत मोदी यांनी हा सुखद अनुभव येथील महिला भगिनींना अनुभवायास दिला त्याबद्दल संकेत मोदी, त्यांची संपूर्ण टीम तथा रोटरॅक्ट क्लबचे अभिनंदन केले. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागात देखील एवढे सुंदर कार्यक्रम संकेत मोदी व डिम्पल मोदी यांच्या वतीने घेतले जातात व येथील महिला, युवती व युवकांना अतिशय उच्च दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या जात असल्या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नवरात्र म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहते ते देवीची नऊ रूप आणि देवीने केलेले महिशासुर राक्षसाचा वध याच आनंदात खेळला जातो तो गरबा म्हणजेच दांडीया असल्याचे अक्षया यांनी सांगितले.
पुढे बोलतांना अक्षया देवधर यांनी आज या गरबा महोत्सवाने काळाच्या ओघात आधुनिक रूप घेतलेले आहे. या महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जात आहेत. विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देखील दिली जात आहेत. या महोत्सवात ८-१० वर्षापासुन ते ६० वर्षाच्या महिला स्पर्धकांचा सहभाग दिसुन येत आहे. येथील हे दृश्य पाहुन आपणांस देखील माझ्या बालपणाची आठवण ताजी झाल्याचे सांगितले. यामुळे अंबाजोगाईकरांचे विशेषत: मोदी परिवाराचे आभार अक्षय्या देवधर यांनी व्यक्त केले. प्रियदर्शनी क्रिडा मंडळाचे संस्थापक मोदी कुटुंब मागील ३५-४० वर्षापासुन समाज सेवेत अग्रेसर आढळुन येत आहे. अनेक संस्थांच्या माध्यमातुन मोदी कुटुंब हे अंबाजोगाई करांची सेवा करत आहेत याबद्दल त्यांनी मोदी परिवाराचे अभिनंदन केले.
शेवटी राजकिशोर मोदी यांनी या महोत्सवात महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन केले. नारी हे शक्तीचे रूप असून त्यांचा सदैव मान सन्मान राखला पाहिजे. महिला ही त्यांच्या आयुष्यात विविध नात्याच्या माध्यमातून आपली निस्वार्थ सेवा बजावत असते. त्यामुळे त्यांना कधीही कमी न लेखता त्यांचा सन्मान करण्याचे आवाहन याप्रसंगी सर्व उपस्थिताना केले. या दांडिया महोत्सवाची म्युझिक व साउंड सिस्टीम अतिशय उच्च दर्जाची ठेवल्याने तिथे आलेल्या प्रत्यकाचे पाय नकळतपणे थिरकल्या जाताना दिसून येत होते. हा संपूर्ण कार्यक्रम केवळ महिलांसाठीच असल्याने येथील सुरक्षा अतिशय शिस्तबद्धतेने पाळली गेली होती. या तीन दिवसीय महोत्वात दररोज ९ महिलांना ९ पैठणी , तीन जोडप्यांना तीन घड्याळ, तीन लहान मुलांना तीन स्मृती चिन्ह याप्रमाणे एकुण १५० बक्षिसांची मेजवानी संपूर्ण महोत्सवात देण्यात आली होती. या संपूर्ण महोत्सवाचे बहारदार सूत्र संचलन सोलापूर येथील निवेदिका कु श्वेता झंवर हिने केले.तर या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी लातूर , परभणी येथील अत्यंत अनुभवी परिक्षक उपस्थित झाले होते. दांडिया महोत्सव २०२४ यशस्वी करण्यासाठी संकेत मोदी मित्र मंडळ व रोटरॅक्ट क्लबचे सर्व संचालक तसेंच श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी बांधव यांनी अथक परिश्रम घेतले.