अंबाजोगाई

जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यातील दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील बीअँड व्हीजन फाउंडेशन लातूरच्या वतीने राजस्थानी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले .अंध व्यक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम चोपडा हे होते.
बीअँड व्हीजन फाउंडेशन ही संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, साहित्य, मनोरंजन ,सांस्कृतिक व सामाजिक पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असणारी लातूर येथील सेवाभावी संस्था असून उद्देशपूर्तीसाठी राज्यभरात विविध कार्यक्रम राबवत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर माधव गोरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली. अनिकेत लोहिया यांनी याप्रसंगी मार्गदर्शन पर भाषण केल.
याप्रसंगी अंबाजोगाई येथील श्री सुहास पाठक आणि मित्र परिवारातर्फे मराठवाड्यातील अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण अनिकेत लोहिया आणि पुरुषोत्तम चोखडा यांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पाठक, जयप्रकाश भुतडा, राजू चोखडा, ईश्वर भुतडा सोमवंशी महाराज यांचे सहकार्य लाभले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव संदीप चोपडे, सह सचिव मीरा चोपडे आणि सहसचिव प्रशांत गवंडगावे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बीड ,लातूर, धाराशिव ,नांदेड, जालना ,छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून 150 दिव्यांग व्यक्ती सहभागी झाले होते. सकाळी पांढरी काठी जनजागृती फेरी अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली. या फेरीमध्ये शंभरहून अधिक अंध व्यक्ती सहभागी झाले होते. कार्यक्रमाच प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. माधव गोरे यांनी केले, तर आभार सचिव प्रशांत गवंडगावे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!