लेहजा इंसान की औकात बता देता है चेहरा अच्छे बुरे हालत बता देता है. विख्यात गझल गायिका पूजा गायतोंडेंच्या गायनाने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील मैफल रंगली
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
गझल आणि सूफी गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविणाऱ्या आणि सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्राप्त पूजा गायतोंडे यांच्या रंगरेझा या मराठी उर्दू हिंदी गझल व सुफी गायनाने अंबाजोगाईकर रसिक तृप्त झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक परंपरेच्या व्यासपीठावर पारंपरिक रागदारीच्या साह्याने पूजा गायतोंडे यांनी गझल आणि सूफी रचना सादर केल्या.त्यांच्या गायकीने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटविला. निसर्गदत्त गोड गळा आणि अद्वितीय क्षमतेच्या बळावर पूजा आज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. अशा या प्रतिभावंत गायिकेला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय पातळीवर पुजाने अनेक सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. दिल्लीतील जामिया मिल्लीया इस्लामिया विद्यापीठाने गायनाच्या कार्यक्रमातही पूजाला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. सुप्रसिद्ध ठाणे फेस्टिवलमध्ये पूजाचा सहभाग होता. पद्मश्री पंकज उदास आणि तलत अजीज यांनी आयोजित केलेल्या खजाना गझल फेस्टिवलमध्येही तिचे सादरीकरण महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. अशा या ख्यातनाम गायिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांमध्ये सर्व रसिक श्रोत्यांना तृप्त केले .सीओन (मुंबई) येथील श्रीवल्लभ संगीत विद्यालयाचे विकास भाटवडेकर, धनश्री पंडित राय, लालजी देसाई, संतोष कुडव, स्वामी चैतन्य स्वरूपजी यांच्यामुळे पूजा खऱ्या अर्थाने सुगम शास्त्रीय गायनाकडे वळली. सध्या उस्ताद मुन्नावर मासूम सईद खान यांच्याकडून ती सूफी आणि गझल गायनाचे धडे गिरवीत आहे. शास्त्रीय गायनातील ख्यातनाम आग्रा घराण्याचे दिवंगत पं. सी.एस.आर. भट आणि त्यांचे शिष्य राजा उपासनी, सुनीता गांगोली यांच्याकडूनही पूजाला शास्त्रीय गायनासाठी मार्गदर्शन लाभले आहे. गायनासोबत पूजाचे हार्मोनियमवरही प्रभुत्व असून ती हार्मोनियमचे शिक्षण पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेत आहे. उस्ताद इब्राहिम दुर्वेश यांच्याकडून अस्खलित उर्दू उच्चार शिकून घेतलेले असल्यामुळे पूजाचे उर्दू वरील प्रभुत्व रसिकांना लगेचच जाणवते आणि त्यामुळेच पूजाची गायकी रसिकांना मंत्रमुग्ध करते. मैफीलीच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे यांच्या हस्ते गायिका पूजा गायतोंडे यांचा आयोजकांच्या वतीने शाल स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तेरी मिरतब मेरा सहारा है , वरना क्या दुनिया मे हमारा है ?
गुरु पीर फकीर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मैफिलीच्या प्रारंभी पूजाने सादर केलेल्या या ओळी रसिक मनावर पकड मिळवून गेल्या.त्यानंतर जयजवंती पिलू मिश्र रागातील झुकी झुकी सी नजर गझलने रसिक आणि गायकीतील अंतर बरेचसे कमी झाले. आणि त्यात सर्वांच्या परिचयाची ही घसल असल्यामुळे पूजाने लयकारी च्या अंगाने विविध ताना घेऊन रसिकांना बरोबर समेवर द्रुपद उचलायला भाग पाडले. अंबाजोगाई का रसिक स्वरांबरोबरच तालातही पक्के आहेत याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने माणसाचे अंतर बाह्य वर्णन करणारी गझल लेजा इंसान की औकात बता देता है चेहरा अच्छे बुरे हालत बता देता है सादर करून रसिकांची दाद मिळवली. या गझलला खऱ्या अर्थाने दाद मिळवली ती शंतनु मयी या तबलावादकाने. गझलच्या अंगाने आणि अत्यंत रंजकतेने त्याने वाजवलेली चौपट लग्गी रसिकांच्या टाळ्या मिळवून गेली. त्यानंतर एक आसू गिरा सोचते सोचते , याद क्या आ गया सोचते सोचते या भावनाप्रधान गझलने रसिकांना स्थितप्रज्ञ केले. या गझल नंतर रसिकांच्या आग्रहास्तव रंजीश ही सही दिल दुखाने के लिए ही प्रचलित रचना रसिकांसाठी सादर केली. सुफी हा प्रकार सर्वच रसिकांना आवडणारा आणि लोकप्रिय प्रकार आहे. या सुफी अंगाने सर्व परिचित असणारी रचना ये जो हलका हलका सुरूर है ये तेरी नजर का कुसुर है सादर करून रसिकांना आपल्या लईत टाळी धरायला भाग पाडले. खरंतर ही रचना नुसरत फते आली खान साहेबांनी आजरामर केलेली आहे. तरीही पूजाने आपल्या कसदार गायकीने या मैफिलीमध्ये चार चांद लावले. मैफीलीचा कहर असाच उत्तरोत्तर वाढत चाललेला असतानाच रसिकांच्या आग्रहस्तवर होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है या धीर गंभीर गझलने वातावरणामध्ये गांभीर्य आणले. पूजा गात असताना तिच्या तोंडून अस्सलिखितपणे निघणारे उर्दू लब्स रसिकांना संमोहित करतात हे नक्की. या गझल नंतर संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली मराठी गझल आकाशा जेव्हा शांत निजतात चांद तारे पांघरून तू मुलायम चांदणे येशील का रे
सादर करून हिंदी उर्दू सोबतच मराठीवर ही आपली मजबूत पकड असल्याचे पूजाने रसिक श्रोत्यांना दाखवून दिले. मैफिल अशीच रंगत भरत असताना रसिकांना डोलायला भाग पाडणारी सुफी रचना दमा दम मस्त कलंदर सादर करून पूजाने वातावरण समोहित केले.काळानुरुप गीत-संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत. गायनाचा अंदाज बदलतो आहे. तरुणाईची आवड वेगळी आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. मात्र याचा अर्थ ‘पॉप’, ‘रिमिक्स’ किंवा वेगवान संगीतामुळे सूफीला धोका आहे असे अजिबात नाही. ज्यावेळी ‘खुदा’च्या ‘इबादत’चा मुद्दा असतो तेव्हा सूफी संगीतच आवडते. तरुणाईलादेखील सूफी संगीत आवडते यात शंकाच नाही. अनेक गायकदेखील हे मानतात. सूफी संगीत शाश्वत आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित रंगरेझा या कार्यक्रमात आला.
त्यानंतर मैफिलीच्या समारोपप्रसंगी आज जाने की जीद ना करो ही भावनाप्रधान रचना सादर केली. खरंतर या भावना रसिकांच्या होत्या परंतु त्याच भावना पूजाने आपल्या गायकीतून व्यक्त केल्या. ही मैफिल अशीच अविरत चालू राहावी अशीच रसिकांची इच्छा होती. परंतु वेळेच्या बंधनामुळे मैफल आटोपती घेणे क्रमप्राप्त होते. विख्यात गायिका पूजा गायतोंडे यांच्या रंगरेझा या कार्यक्रमासाठी तबला साथ शंतनू मयी मुंबई ढोलक योगेश इंदोरिया मुंबई व सिंथेसायझर साथ मनोज राऊत अकोला यांनी केली. मैथिलीच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे सचिव व आयोजक साहित्यिक व संगीत समीक्षक श्री दगडू लोमटे यांनी गायिका पूजा गायतोंडे यांचा सर्व रसिक श्रोत्यांना परिचय करून दिला. त्यासोबतच स्मृती समारोहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या फोटो प्रदर्शनातील उत्कृष्ट फोटोग्राफर्स अभिजीत लोहिया शुभदा लोहिया त्रिंबक पोखरकर मुन्ना सोमानी अविनाश मुंडे नीरज गौड अजिंक्य भिसे अनंत मसने सुनील जाधव राजा कोंबडे मोईन शेख परभणी तसेच स्मृतीसमारोहासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या मैफिलीसाठी रसिकांची अभूतपूर्व उपस्थिती होती.