अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या वतीने देशातील विविध क्षेत्रातील विविध नामवंत मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार श्रीपाद नाईक , तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल हे होते. महासभेचे नवनियुक्त अध्यक्ष राजकिशोर मोदी , माजी मंत्री प्रकाश चौधरी, प्रदीप जयस्वाल, सुरेंद्रपाल अहलुवालिया, राजा चौधरी, आमदार श्रीमती अनुपमा जयस्वाल, अटल गुप्ता, अर्चना जयस्वाल, कुमार गौड , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या दहाव्या राष्ट्रीय महा अधिवेशना दरम्यान वितरित करण्यात आले.
महासभेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या देशभरातील मान्यवारांमध्ये प्रामुख्याने आमदार प्रदीप शिवनारायन जायसवाल (छत्रपती संभाजीनगर), माजी आमदार तथा माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश नाथुलालजी चौधरी ,(बडी सादडी जिल्हा चितोडगड , राजस्थान), प्रदीपकुमार धिरजलालजी जायसवाल (बडोदा ,गुजरात), जेष्ठ समाजसेवक भरतलाल बाबूलालजी जायसवाल (इंदोर, मध्यप्रदेश), जेष्ठ समाजसेवक ईश्वरचंदजी रामकांतजी साव (मुंबई, महाराष्ट्र) , बी मधूसुदनजी जायसवाल (हैदराबाद ,तेलंगाणा) , लक्ष्मी नारायण परमेश्वर जायसवाल (अकोला महाराष्ट्र) यांचा समावेश होता.
याप्रसंगी संयोजक तथा २०२५-२०२८ चे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवांचे अभिनंदन करत त्यांनी केलेल्या समाजकार्याचा उहापोह केला. महासभेच्या वतीने पुरस्कारासाठी व्यक्ती निवडतांना देशातील सर्व भागातील समाज बांधवांना समावेशीत करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महासभेच्या सर्वोच्च अशा पदासाठी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून माझी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्व समाजबांधव तथा सर्ववर्गीय महासभेच्या सदैव ऋणात राहण्याचा प्रयत्न करून यापुढे समाजास एकसंघ करून त्यास पुढे नेण्याचा प्रयत्न करेन अशी भावना राजकिशोर मोदी यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे देशाचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार श्रीपाद नाईक यांनी देखील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. संयोजकांनी पुरस्काराला साजेशा व्यक्तींचीच निवड करून त्या पुरस्काराची उंची वाढवल्याचे मत यावेळी नमूद केले. देशभरात बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या समाजास या अधिवेशनप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी एकत्र आणल्याबद्दल त्याचे कौतुक केले. त्याचबरोबर मोदी हे त्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या कार्य काळात समाजाच्या विविध प्रश्नांची उकल महासभेच्या वतीने करतील अशी अपेक्षा देखील नाईक यांनी व्यक्त केली. दिलेल्या पुरस्काराने त्या त्या व्यक्तीची सामाजिक जवाबदारी वाढल्या जाऊन पुन्हा त्यांना आपले सामाजिक कार्य जोमाने पुढे न्यावे लागणार असल्याने या समाजभूषण कार्यक्रम प्रसंगी नमूद केले.
अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जयसवाल यांनी निवड झालेल्या या सर्व मान्यवरांनी देशभरात केलेल्या सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना जायसवाल महासभेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या समाजभूषण पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार दि १२ रोजी मोदी लर्निंग सेंटर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला देशभरातून दोन हजारावर जयस्वाल समाज उपस्थित होता.