रस्ता रूंदीकरणात पाडली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दवाखाना या राज्य मार्गावरील अतिक्रमणे?विकासाच्या नांवाखाली गोरगरिबांचे संसार उद्धवस्त केले – ऍड.इस्माईल गवळी व कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांची पत्रकार परिषद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रस्त्याच्या रूंदीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वाराती दवाखाना या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहत असलेल्या २०० हून अधिक नागरिकांची घरे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रश्नी गोरगरीब नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी अंबाजोगाईतील सदर बाजार चौक येथे गुरूवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमीन अधिगृहणाबाबत लेखी सूचना नाही, मालमत्तांबाबत काय निर्णय घेतला असा सवाल करून विकासाच्या नांवाखाली गोरगरिबांचे संसार उद्धवस्त केले हे योग्य नाही. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत असे ऍड.इस्माईल गवळी व कॉ.बब्रुवाहन पोटभरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
अंबाजोगाई शहरात रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नांवाखाली गुत्तेदार लोकांची घरे भरण्याचे काम चालू आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. पण, रस्ता किती फुटांचा होणार ? अतिक्रमणाच्या नांवाखाली गोरगरीब लोकांचे संसार उद्धवस्त केले. त्यामुळे आता या अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन होणार की, नाही ? छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वाराती दवाखाना हा रस्ता राज्य मार्ग कधी झाला व त्याची प्रक्रिया काय आहे ?, दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे नाली बांधकाम ८० फुटांचे का केले. मग रस्त्याच्या मध्यभागी (सेंटर) पासून किती अंतर मोजले..?, नागरिकांच्या अतिक्रमणांचे पंचनामे केले नाही, तसेच ज्यांची घरे मालकीची आहेत त्यांना जमीन अधिगृहणाबाबत लेखी सूचना का दिल्या नाहीत, मालमत्तांबाबत काय निर्णय घेतला..?, अंबाजोगाई शहरातून १०० फुटांचा रस्ता करण्याची काय आवश्यकता, गरज होती..?, हि तत्परता येल्डा रोडबाबत का दाखवली नाही..? मागील पाच वर्षांपासून हा रस्ता रखडला आहे, या नादुरूस्त रस्त्यामुळे १७ लोकांचा जीव गेला आहे. अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या समोरील दुकाने हटवली. त्यांना त्या जागेवर दुकान का दिले नाही. मंडी बाजार भागातील रस्त्यांच्या कडेला कसे दिले. एकाच शहरात दोन भूमिका वेगवेगळा न्याय कशासाठी..? अनेक वर्षांपासून शहरातील विविध शासकीय कार्यालयात ३ वर्षांपासून अधिक काळ अधिकारी, कर्मचारी म्हणून ठाण मांडून बसलेले आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीचा कायदा लागू नाही का..?, वाढत्या घरफोडी, चोऱ्या, वाहन चोरी, मारहाण, खून या सारख्या घटनांमुळे जनता भयभीत आहे. तरी अंबाजोगाई शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. अशी नागरिकांची अपेक्षा आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयातील बनावट औषध खरेदी घोटाळा प्रकरणी सखोल न्यायालयीन चौकशी करून संबंधित दोषी कंपन्या, कंत्राटदार, जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा मुद्द्यांवर सदरील पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात आली. तसेच पुनर्वसनाबाबत कुठलीही माहिती न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या पीटीआर, खरेदीखत, सातबारा या मालकी पुराव्यांची पाहणी न करता जी अतिक्रमणाच्या नांवाखाली बांधकामे पाडली आहेत. दिलेल्या नोटीसीत अर्थबोध होत नाही. याचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत, आमचे अतिक्रमणाला समर्थन नाही तर अतिक्रमणाच्या नोंदी घेवून दंडात्मक कार्यवाही करण्यास ही आमचा विरोध नाही. असे ही पत्रकार परिषदेत ॲड.इस्माईल गवळी यांनी सांगितले. तर कॉ.बब्रुवाहन पोटभरे म्हणाले की, संपूर्ण देशात कार्पोरेट, सनातनी सत्ता आदिवासी, अल्पसंख्यांक, दलित, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या विरोधात काम करीत आहे. कुणाचे घर मोडून विकास नको आहे. जाणीवपूर्वक जनतेला वेठीस धरू नका. जनतेवर सुड उगवू नका. गलिच्छ वस्त्यांचे पुनर्वसन करा, अंबाजोगाई शहरात मुख्य रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ‘स्वाराती’ रूग्णालय रस्त्यावर अनेक जणांचे शेकडो वर्षांपासूनची खाजगी मालकीची घरे असून तेही पाडण्यात आली आहेत. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत कुठल्याही पध्दतीची माहिती न देता अतिक्रमणे काढत आहेत. खाजगी मालकीच्या लोकांना मोबदला मिळणार का ? त्यांचे पुनर्वसन होणार का ? सगळे प्रश्न अनुत्तरित असताना पोलिस बळाचा वापर करून अतिक्रमणे काढण्याची घाई कशाला ? पोलिसांनी सामान्य लोकांना भिती दाखवू नये, या प्रकरणी जनतेला विश्वासात घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला. या पत्रकार परिषदेला जहिरभाई, अन्वरभाई तसेच अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी लवकरच विस्थापित झालेल्या नागरिक आंदोलन करतील. अशी माहिती कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
======================================