भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.६ फेब्रुवारी रोजी गाणकोकिळा स्वरलता मैफिलीचे आयोजन
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. त्यांच्या स्वर्गीय स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचे! फक्त संगीत जगतातच नव्हे तर अखिल विश्वामध्ये आपल्या सुमधुर गायकीने अक्षरशः वेड लावणाऱ्या अशा या महान तपस्वी, तेजस्वी गायिकेच्या पुण्यस्मरणानिमित्त मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या अंबाजोगाई शहरांमध्ये स्थानिक कलावंतांच्या आविट स्वरांनी नटलेल्या “गान कोकिळा स्वरलता” या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी कलाकार कट्टा अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई वसुंधरा सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्ष नगरपरिषद वाचनालय अंबाजोगाई या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व प्रमुख उपस्थिती मराठवाड्याच्या गुणी गायिका प्रति लता सौ.गीता जायभाये यांची उपस्थिती असणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायकीचा मोह सर्व आबालवृद्धांनाच आहे. यावत सूर्य चंद्र तारे असेपर्यंत स्व. लतादीदींची विविध गाणी अजरामर राहणार असून सदैव ऐकली जाणार आहेत हे नक्की. अंबाजोगाई येथील सर्व गुणी स्थानिक कलावंतांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या गान कोकिळा स्वरलता या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता आंबेकर , रो.कल्याण काळे,रो. धनराज सोळंकी, प्रशांत लाटकर, संपादक परमेश्वर गित्ते, बळीराम चोपणे, अनंत आरसुडे, कलाकार कट्टा, अंबाजोगाई रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई ,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.