*विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा निश्चित करून ध्येयाकडे वाटचाल करावी – व्यंकटराव रेड्डी*
(विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलन बक्षीस वितरण समारंभ)
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी स्वतःतील गुण, क्षमता आणि कमतरता ओळखून जीवनाची दिशा निश्चित करून ध्येयाकडे वाटचाल करावी असे विचार लोकमान्य टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व्यंकटराव रेड्डी यांनी व्यक्त केले.
दि.०५ फेब्रुवारी २०२५ बुधवार रोजी पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात संपन्न झालेल्या ‘विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलन बक्षीस वितरण’ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना रेड्डी म्हणाले की,शाळेने केलेल्या संस्कारांचा उपयोग करून आपण सातत्य,मनन, चिंतन यातून ध्येय प्राप्ती कडे वाटचाल करावी जेणेकरून आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल.संमेलनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये धाडस,निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. यातुन विद्यार्थ्यांची खरी जडण-घडण होते.विद्यार्थ्यांनी भावी काळाचे योग्य नियोजन करत आई,वडील आणि गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करावे असे विचार शेवटी त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते आणि संमेलन प्रमुख ज्ञानेश मातेकर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकात संमेलन प्रमुख ज्ञानेश मातेकर यांनी विविध मंडळांतर्गत स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात संजय विभूते यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यात विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी आपल्यातील कलागुणांचा वापर करावा असे प्रतिपादन केले.
या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनातील विविध स्पर्धेतील यशवंत आणि नागपूर येथील एकलव्य स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू तेलंगे,वैयक्तिक पद्य कु.नेहा वाघमारे तर आभार प्रदर्शन राकेश मोरे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने करण्यात आली.
कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.