अंबाजोगाई

*कुळवाडी भूषण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा!*

अंबाजोगाई प्रतिनिधी : श्री संत गजानन अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेक घोबाळे यांच्या अध्यक्षतेखाली कुळवाडी भूषण, रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते शिवश्री बालाजी शेरेकर यांनी “शिवकालाचे खरे अंतरंग” या विषयावर मांडणी करत प्रामुख्याने शरद जोशी यांच्या ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’, महात्मा जोतिबा फुले यांचा महाराजांवरील दिर्घ पोवाडा, ‘द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज’, ‘रयतेचे राजे शिवाजी महाराज’, कॉ. गोविंद पानसरे सर यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखित ‘शिवाजी महाराज’ तसेच नरहर कुरुंदकर यांनी महाराजांवरील विविध लिखाण व व्याख्यान असे विविध संदर्भ देत मांडणी केली. ते पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामागे जिजाऊंचा असंख्य त्याग आणि समर्पण होतं. खरंतर रयतेच्या स्वराज्याची मूर्तमेढ जिजाऊ या शब्दात सामावलेली दिसते जि- जिज्ञासा, जा- जागृती, ऊ- उत्कर्ष अशा त्रिरत्नांनी उमगलेलं स्वराज्याचं पहिलं पाऊल म्हणजे माँ जिजाऊ. ज्या पद्धतीने जिजाऊंवर संस्कार झाले अगदी त्याच पद्धतीने शिवबावर संस्कार केले. आणि मूठभर मावळ्यांच्या सोबत स्वराज्याची स्थापना केली. असे विविध संदर्भ सहित उदाहरणे देऊन शिवचरित्र डोळ्यासमोर उभे केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोबाळे सरांनी अध्यक्षीय समारोपात छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्य’ मिळवून दिलं पण ते टिकून ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या भारत देशाला दिलं यापुढे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की, हे ‘स्वराज्य’ ‘लोकशाही’ मजबूत खांबाप्रमाणे न डगमगता कसं टिकून ठेवता येईल यासाठी अथक प्रयत्नांची गरज वाटते.

या आधुनिक युगात शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या ज्ञानपेरणीतून शिवबा, महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांच्या विचाराचे खरे व प्रामाणिक वारसदार तयार केले पाहिजे. शिक्षक केवळ विद्यार्थीचं घडवत नसतो, तर तो देशाचं नव्हेतर अखिल जगाचं भवितव्य घडवत असतो. आज युगात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जे शक्य नाही ते शक्य होत आहे. याचा सुयोग्य वापर करून छात्र अध्यापकांनी प्रभावी अध्ययन-अध्यापन करावे. वाचनासाठी मूळ संदर्भ ग्रंथांना प्राधान्य द्यावे. जेणेकरून आपल्या “बुद्धी व विचारांचा आवाका समुद्राप्रमाणे वाढायला हवा”, एकवेळ “पोटाची भूक कमी अधिक प्रमाणात मिटेलही परंतु वाचनाची व विचारांची भूक ही कायम असावी!” आणि ती कधीही मिटता कामा नये. असे प्रतिपादन केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सभागृहास “छत्रपती शिवाजी महाराज ‘स्वराज्य’ सभागृह” हे नाव देऊन संस्थेच्या लवकिकतेत भर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छात्र अध्यापक विद्यार्थ्यांनी रांगोळी, प्रबोधनपर गीत, भाषणे इत्यादी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयातील प्रा. अनिल बांगर, ग्रंथपाल सचिन गायकवाड, लिपिक श्रीपाद कुलकर्णी, प्राध्यापक, कर्मचारी व छात्रअध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापक रोहिणी यादव व नमिता झिरमिरे, स्वागत गीत संध्या जाधव तर आभार रघुनाथ देशमुख यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!