अंबाजोगाई

*राष्ट्रीय एकात्मता की, ऐतिहासिक संदर्भ नेमके काय महत्त्वाचे हे ठरविण्याची वेळ आली आहे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले*

अंबाजोगाई प्रतिनिधी:-

भारत देशातील सद्य:परिस्थिती पाहता देश जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, गरीबी श्रीमंती या भेदभावाच्या आधारावर उभ्या फुटीच्या मार्गावर जात आहे. इतिहासाचा उपयोग करून संधी साधू राजकारणी आपला मतलब साध्य करण्यासाठी विविध जाती धर्मांमध्ये भांडण लावण्यासाठी ऐतिहासिक संदर्भांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची की, इतिहासामधील ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचे याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी केले. ते सेंट ऍंथनी स्कूल मधील वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी उदघाटक मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर फादर प्रदीप कुमार, मेजर दिलीप निकम, प्राचार्य नन आरोग्यम यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉ.राजेश इंगोले व मेजर दिलीप निकम यांच्याहस्ते क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी राजकारण्यांनी या देशाचे वाटोळे करण्याचा प्रन केलेला आहे. आपल्यालाच राज्यसत्ता प्राप्त व्हावी म्हणून माणसांमध्ये जाती-धर्माच्या आधारे द्वेष निर्माण करून सामाजिक एकात्मते मध्ये दोन्ही करण्याचे पाप हे राजकारणी करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता प्रचंड प्रमाणात धोक्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आता सध्या परिस्थितीमध्ये सामान्य जनतेने घडत असलेल्या गोष्टींचे आकलन करून त्या योग्य आहेत की अयोग्य हे ठरवण्याची वेळ आलेली आहे कोणताही राजकारणी विश्वासार्ह न राहिल्याने विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा निर्माण करण्यापेक्षा इतर जातींविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम करीत आहे. किंबहुना हे चित्रपट याच हेतून काढलेत की काय अशी शंका मनामध्ये राहून राहून येते. त्यामुळे समाजातील जबाबदार घटकांनी डॉक्टर्स, वकील, शिक्षक, प्राध्यापक यांनी आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना, समाजाला काय चूक आहे व काय बरोबर आहे याचे योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. जनतेला इतिहासामध्ये काय घडले आहे, कसे चुकीचे घडले होते यामध्येच गुंग करून अडकवून ठेवले आहे. काय चुकीचे घडले यापेक्षा काय बरोबर घडवायचे आहे यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीमध्ये राष्ट्राने काय प्रगती केली आहे, सरकारने लोकांसाठी कोणत्या जनहित कार्य योजना आणलेले आहेत याचा उहापोह होऊ नये म्हणून सरकार भावनिक मुद्दे निर्माण करून विकासाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवून टाकत आहे. हे षडयंत्र लोकांच्या लक्षात आले पाहिजे याकरिता समाजातील जबाबदार घटकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. समाजामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत आहे. युवकांपुढे गुंड लोक रोल मॉडेल म्हणून येत आहेत. समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत रोज खुनाच्या, बलात्काराच्या घटना ऐकून कान सुन्न झाले आहेत. याचं कारण म्हणजे पुस्तकातलं पहिलं पान शिकवायचंच राहून गेलेल आहे ज्यामध्ये भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे लिहिलं आहे. ही खंत डॉ. इंगोले यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपले कला, क्रीडा कौशल्य वापरून आपल्या बुद्धीचा मेंदूचा शरीराचा विकास करून घेऊन सशक्त आणि निरोगी बनावे व राष्ट्रहितासाठी कार्य करावे अशी अपेक्षा डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी फादर प्रदीप कुमार यांनी विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी अभ्यासासोबतच एखादी कला किंवा क्रीडा कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना मेजर दिलीप निकम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली मी, प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय ही गोष्ट प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवून देशाप्रती समर्पणाची भावना ठेवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.राजेश इंगोले व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!