*जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचे रूपांतर यशात करा – डॉ.राजेश इंगोले*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
वाट पाहणाऱ्या लोकांना जीवन संधी नाही तर संकटांची भेट देते त्यामुळे वाट पाहणाऱ्या लोकांच्या वाट्याला प्रयत्न करून नेणाऱ्या विजेत्यांनी जेवढे सोडलं आहे. त्यावरच समाधान मानावे लागत. त्यामुळे आयुष्यामध्ये वाट पाहण्यापेक्षा संधी निर्माण करून, मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या जीवनामध्ये प्रगतीकडे, यशाकडे वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
अंबाजोगाई येथील व्यंकटेश नर्सिंग स्कूल येथे लॅम्प लाईटनिंग व विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेची शपथग्रहण सोहळ्यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या मुलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर संस्थेचे प्राचार्य धनंजय शिंदे तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुष्यात कष्ट करण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे तरच जीवनामध्ये यश मिळते वैद्यकीय सेवांमध्ये व्यक्तिमध्ये सेवा, समर्पण, त्याग, साहस , प्रसंगवधान, बलिदान, प्रेम, सहकार्य, बंधुत्व हे गुण असले पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये हे गुण आत्मसात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा पप्रयत्न करावा आणि स्वतःला ट्रान्सफॉर्म करून वैद्यकीय सेवेसाठी तयार करून घ्यावे अशी अपेक्षा डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माणुसकी हा गुण सदैव जागृत ठेवला पाहिजे त्यामुळे सेवा करणारा वैद्यक किंवा वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी हे जात, धर्म, पंथ, लिंगभेद, गरिबी, श्रीमंती हा भेद बाजूला सारून, रूग्णाला रूग्ण मानून त्याची सेवा करेल. कोणतेही शास्त्र हे परिपूर्ण नसते, जगामध्ये दररोज नवनवीन संशोधन होत असते त्यानुसार त्या शास्त्राला बदलून घ्यावे लागते. जुन्या संकल्पना, धारणा, सूत्रे हे बदलल्यास नवीन शास्त्रशुद्ध व सिद्ध झालेल्या गोष्टींना प्रमाण मानून त्या गोष्टींना स्वीकारावे लागते. हा बदल आणि ही मानसिकता प्रत्येक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. वैद्यकशास्त्र हे तीव्र गतीने बदलत जाणारे शास्त्र आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान हे दररोज बदलत आहे त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हे अत्याधुनिक ज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग समाजासाठी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरूवात डॉक्टर राजेश इंगोले व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेची शपथ मान्यवरांच्या हस्ते देऊन लॅम्प लाईटनिंग करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य धनंजय शिंदे, प्रा.सुर्यवंशी, नर्सिंगचे अधिव्याख्याता प्रा.सोळंके व प्रा.लोमटे यांची ही समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सोळंके यांनी मानले.
===========================================