अंबाजोगाई

*अंबाजोगाईत अन्नत्याग आंदोलनानिमित्त विविध उपक्रम पाचशे विधवा महिलांचा साडीचोळी देवून बाजार समितीने केला सन्मान:–अ‍ॅड.संतोष पवार शेतकरी सहवेदना पुरस्काराने सन्मानित*

अंबाजोगाई प्रतिनिधी -: अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने अंबाजोगाईत बुधवारी सामुहिक उपवास करत पाचशे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. तर यावेळी आधार माणूसकीचा या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष पवार यांना शेतकरी सहवेदना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद शेळके यांनी शेतकरी आत्महत्या कारण आणि मिमानसा या विषयावर व्याख्यान दिले. अशा विविध उपक्रमांनी अन्नत्याग आंदोलन समितीने हा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला.

१९ मार्च हा दिवस शेतकरी सहवेदना दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन किसानपुत्र आंदोलन शेतकरी संघटना व आधार माणसूकीचा यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.राजेश्‍वर चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद शेळके, अन्नत्याग आंदोलन समितीचे प्रमुख तथा या आंदोलनाचे संयोजक सुदर्शन रापतवार, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, आधार माणूसकीचा या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष पवार, आशा अमर हबीब, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींच्या प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर मुंडे यांची उपस्थिती होती. अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम यावेळी झाला. येथील प्रगतशील शेतकरी अनिरूद्ध चौसाळकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच वसंत मोरे, प्रा.शांतीनाथ बनसोडे, मुजीब काझी, अनिरूद्ध चौसाळकर, सुभाष बाहेती, अच्युत गंगणे, प्रा.पंडीत कराड, मदन परदेशी यांच्यासह अन्नत्याग आंदोलन सतितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

*या व्यवस्थेला जबाबदार कोण?- गोविंद शेळके*

शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत., शेतमालाला न मिळणारे हमीभाव, शेतकर्‍यांप्रती सर्वांचेच होणारे दुर्लक्ष यामुळे अस्थिर जगणं असय्य होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात मात्र हे शेतकर्‍याचं अस्तिर जीवन कोण करतं? या प्रश्‍नाची उकल झाली पाहिजे. आणखी किती शेतकर्‍यांचे बलीदान हवे आहे? या बाबतीत परिवर्तन होणार की नाही? या व्यवस्थेला जबाबदार कोण? अशा अनेक प्रश्‍नांवर गोविंद शेळके यांनी आपले विचार व्यक्त केले.

*पाचशे विधवा महिलांचा साडीचोळी देवून बाजार समितीने केला सन्मान*

शेतकरी सहवेदना दिननिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाचशे विधवा पत्नींचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.राजेश्‍वर चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला. समाजात शेतकरी हाच वर्ग उपेक्षित राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यवस्था परिवतीत करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे अ‍ॅड.चव्हाण यांनी सांगितले. यावेळी परळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, माजी आ.संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बाजीराव धर्माधिकारी, गोविंद देशमुख व मान्यवरांच्या हस्ते यावेळी महिलांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले.

*अ‍ॅड.संतोष पवार शेतकरी सहवेदना पुरस्काराने सन्मानित*

आधार माणसूकीचा संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांना किसानपुत्र आंदोलन व अन्नत्याग समितीच्या वतीने दिला जाणारा शेतकरी सहवेदना पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देवून प्रदान करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन अभिजीत जोंधळे यांनी केले. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना संतोष पवार म्हणाले की, समाजातील उपेक्षितांच्या मदतीसाठी काम करता आले पाहिजे. समाजात आजही अनेक जण उपेक्षित, वंचित आहेत. त्यांना मदतीची मोठी गरज आहे. अशा सर्व उपेक्षितांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!