स्वच्छता कामगारांच्या चेहऱ्यावर मुख्याधिकाऱ्यांनी फुलविले हसू : मानधनात केली मोठी वाढ, वाचा…
अंबाजोगाई प्रतिनिधी:- अंबाजोगाई शहराचं आरोग्य अबाधित ठेवण्यात स्वच्छता कामगारांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हे कामगार तुटपुंजा मानधनावर काम करीत होते. पण आता त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळणार आहे. नगपरिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांनी स्वच्छता कामगारांना दिलासा देत त्यांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेचा प्रशासकाचा पदभार स्विकारल्यापासून डॉ. प्रियांका टोंगे यांनी कामाचा सपाटा लावला आहे. आपल्या कार्याची चुणूक दाखवीत त्यांनी नगरपरिषद प्रशासनावर पकड मजबूत केली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारात सुसूत्रता आणली आहे. नगरपरिषदेच्या सर्व महत्वाच्या विभागात त्यांनी जनतेच्या सोईसाठी आमुलाग्र बदल केले आहेत. त्याचा उपयोग अंबाजोगाईकरांना होत आहे. अंबाजोगाईकरांना चांगली सेवा देण्याबरोबरचं नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीही त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करतात. नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा वाढीव मानधनाचा प्रश्न त्यांनी निकाली काढला आहे. त्यांच्या या निर्णयामुळं स्वच्छता कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 150 कंत्राटी स्वच्छता कामगार काम करतात. महागाईच्या या काळात तुटपुंज्या मानधनावर ते संपूर्ण अंबाजोगाई शहर स्वच्छ करतात. मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी लागलीच यावर कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी कामगारांच्या हितासाठी एक परिपूर्ण प्रस्ताव मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांना सादर केला. या प्रस्तावाला लागलीच मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या मानधनात जानेवारी 2025 पासून मोठी वाढ करण्यात आली आहे. आता स्वच्छता कामगारांचा पगार जवळपास 10 हजारांनी वाढला असून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुविधा या कंत्राटी स्वच्छता कामगारांना मिळणार आहेत. मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. स्वच्छता कामगारांनीही मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे आणि स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांचे आभार मानले आहेत.