*अंबाजोगाई महाराष्ट्रातले तिसरे पुस्तकांचे गाव जाहीर – उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांची घोषणा*
*आद्यकवी मुकुंदराज यांच्या नांवाने राज्यस्तरीय पुरस्कार देणार ; माता श्री योगेश्वरी देवी, आद्यकवी मुकुंदराज व सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसर विकासासाठी पुढाकार घेणार*
*राजकिशोर मोदी यांच्या पाठपुराव्याला यश ; अंबाजोगाईकरांच्या वतीने केली होती निवेदनाद्वारे मागणी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
समस्त अंबाजोगाईकरांची बऱ्याच दिवसांपासून अपेक्षा होती की, अंबाजोगाई शहर हे पुस्तकांचे गाव जाहीर करावे. याकरिता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांनी वैयक्तिकरित्या कॅबिनेट मंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जुलै २०२४ मध्येही पत्राद्वारे मागणी केली होती. मोदी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले असून बुधवारी बीड शहरात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत हे आले असता त्यांनी अंबाजोगाई शहर तिसरे पुस्तकांचे गांव होणार, आद्यकवी मुकुंदराज यांच्या नांवाने राज्यस्तरीय पुरस्कार देणार आणि माता श्री योगेश्वरी देवी, आद्यकवी मुकुंदराज व सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसर विकासासाठी पुढाकार घेणार असे जाहीर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह आद्यकवी मुकुंदराज ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प किसन महाराज पवार, बीडच्या प्राचार्या डॉ दिपाताई क्षीरसागर, जेष्ठ साहित्यीक सतीश साळुंके, कवी साळगावकर, अतुल कुलकर्णी, संजय देवळनकर, शिवसेनेचे सचिन मुळुक, अनिल जगताप हे उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मुकुंदराज संस्थानचे किसन महाराज पवार यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहर हे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्य, नाट्य, क्रीडा, सहकार, ग्रंथ, परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र
आहे. येथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधीस्थळ आहे. ग्रामदेवता माता श्री योगेश्वरी चे मंदिर आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहर हे पर्यटनदृष्ट्या सक्षम असून लेखक, साहित्यिक व वाचन प्रेमी वर्ग या शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वाचन संस्कृतीला बळ देणारे असे विविध उपक्रम वर्षभर अंबाजोगाईमध्ये राबविले जातात.
अंबाजोगाई ही मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज, प्रकांड पंडित सर्वज्ञ दासोपंत यांची कर्मभूमी आहे. तसेच कोकणस्थांची कुलदेवता माता योगेश्वरी देवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेले गांव आहे. नदी, डोंगर, वनराई, पशु पक्षी यासोबतच मंदिराचे गांव म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचे नेतृत्व ज्यांनी केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या लोककार्याची साक्ष देणारे हे गांव आहे. दिवंगत नेते प्रमोदजी महाजन, दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार बापूसाहेब काळदाते, माजी आमदार बाबुरावजी आडसकर, डॉ.द्वारकादास लोहिया, भगवानराव लोमटे बापू, डॉ.व्यंकटराव डावळे, रामकाका मुकादम यांच्यासह अनेक मान्यवरांनी विविध क्षेत्रात अंबाजोगाईचा लौकिक सर्वदूर केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ तिवारी, अमर हबीब, स्व.शैलाताई लोहिया, डॉ.नागरगोजे, दिनकर जोशी, दगडू लोमटे, बालाजी सुतार, मुकूंद राजपंखे, प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे,प्रा किरण कांबळे, प्रा.गौतम गायकवाड, बलभीम तरकसे, विश्वांभर वराट गुरूजी, स्व.प्रा.संभाजी सावळकर यांनी अंबाजोगाई साहित्य संमेलन चळवळीला बळ दिले आहे.
अंबाजोगाई शहरात बालझुंब्बड’ सारखा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. ‘बालझुंब्बड’ मुळे नव्या पिढीला एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ‘बालझुंब्बड’ ने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. हे विशेष होय. अशा वैविध्यपूर्ण बाबींमुळे अंबाजोगाई शहर तिसरे पुस्तकांचे गाव समस्त अंबाजोगाईकरांच्या मागणीला मिळालेलं हे सर्वांत मोठं यश असून ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे. अंबाजोगाई शहर तिसरे पुस्तकांचे गांव होणार, आद्यकवी मुकुंदराज यांच्या नांवाने राज्यस्तरीय पुरस्कार देणार आणि माता श्री योगेश्वरी देवी, आद्यकवी मुकुंदराज व सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसर विकासासाठी पुढाकार घेणार असे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत बीड येथे बुधवार, दिनांक १६ एप्रिल रोजी जाहीर केल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मुकुंदराज समाधी परिसर हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करावे व यासाठी वन विभागाकडील पाच एक्कर जागा ही मुकुंदराज संस्थानला उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर देखील वनमंत्री ना गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन यावर देखील सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द ना. उदय सामंत यांनी याप्रसंगी दिल्याचे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. त्याचबरोबर विवेकसिंधु हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करून तो ग्रंथ राज्यातील प्रत्येक वाचनालयात ठेवण्याची मागणी जेष्ठ साहित्यिक साळेगावकर यांनी यावेळी केली व ती मागणी देखील उदय सामंत यांनी तात्काळ मान्य केल्याचे मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई करांच्या या सर्व मागण्यांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकिशोर मोदी व मुकुंदराज संस्थानचे किसन महाराज पवार यांनी समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.