*जीवनात यशस्वी होण्यासाठी विजेत्यांसारखी मानसिकता हवी – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले*प्रकाश मुथा स्मृतीप्रित्यर्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विजेत्याची मानसिकता विकसित करणे ही एक प्रक्रिया आहे, जी अवघड नाही. पण, नियमित प्रयत्नांनी आणि सकारात्मक विचारांनी ती नक्कीच साध्य करता येते. आपण जर या मानसिकतेवर काम केले, तर आपण आपल्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा व्याख्याते डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
स्व.प्रकाश सुरजमल मूथा यांच्या स्मरणार्थ आयोजित शुमा कप – 2025 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर स्वारातीचे विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राजेश इंगोले, सौ.सुरेखा सिरसाट, सौ.देशमुख, श्रीमती प्रेमा मुथा, सौ. विजया मुथा, प्रा.भूषण गवली, सौ. उज्वला मुथा, सौ.संगीता मुथा, निलेश मुथा, समीर लाटा, प्रतीक बोथरा, हर्ष मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी विजेत्याची मानसिकता ही मनाची एक सकारात्मक अवस्था आहे जी आत्मविश्वास, प्रेरणा, दृढनिश्चय, लवचिकता आणि मानसिक कणखरता या सारख्या गुणांनी वैशिष्ट्यीकृत आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या खेळाच्या कौशल्यासोबतच विजेता मानसिकता आपल्या अंगी विकसित करण्यावर भर द्यावा असे मार्गदर्शन खेळाडूंना केले. संघर्षाशिवाय यश नाही आणि परिश्रमाला पर्याय नाही असे सांगत विजेते एका रात्रीत घडत नाहीत तर त्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे केलेली तपस्या त्यांना विजेते घडविते असे डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले. अंबाजोगाई मध्ये क्रिकेट खेळ हे एक करीयर असू शकते हा विचार रूजवणारे अंबाजोगाई क्रिकेट अकादमी आणि शुमा क्रिकेट अकादमीचे मोहित परमार आणि माही परमार हे ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय संधी प्राप्त करून देत असल्याबद्दल डॉ.राजेश इंगोले यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलतांना डॉ सिद्धेश्वर बिराजदार यांनी कोणताही खेळ खेळत असतांना खिलाडू वृत्ती आणि प्रामाणिकपणा हा त्या खेळाचा आत्मा असतो. त्यामुळे खेळाडूंनी प्रामाणिकपणा, परिश्रम आणि खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. हार-जीत हा खेळाचा भाग असतो तो स्वीकारून नव्या ताकतीने पुढे जाता आले पाहिजे असे मत व्यक्त केले. या वेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.सुरेखा सिरसाट यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करताना खेळ आणि जीवन यात खूप साम्य आहे असे सांगत खेळ खेळण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. शारदा शिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण गवळी यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की संयमी क्रिकेट खेळून मुलांनी आपल्यात असलेल्या कला गुणांना वाव द्यावे, लहान वयातच आधुनिक लेदरबॉलचे प्रशिक्षण मिळते, भविष्यात मोठे खेळाडू बनू शकतात असे मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत आयुष एकादश संघाने विजेतेपद पटकावले तर शिवम व्हिजन एकादश संघाला उपविजेतेपद मिळाले. यावेळी विजयी खेळाडूंना जैन एजन्सीज व सौ रेहाना पाटील यांच्या कडून विजयी खेळाडूंना रोख पारितोषिक, ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथींचे स्वागत सुरज कांबळे रूपेश जाधव, माही परमार, लीना किथे, सौ.चोबे, सौ.पवार, गौरव कुलकर्णी, सौ.रेहाना यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहित परमार, माही परमार यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश मुथा यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनात इनर व्हील क्लब यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिकेट अकादमीचे मोहित परमार, अलोक भारती, यशवंत शिनगारे, शिवम पाटील, प्रणव केंद्रे, आयुष दामा यांनी परिश्रम घेतले.