*प्रबोधनपर चळवळीतील कलावंतांनी प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारला – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले*
*’एक शाम, भीम के नाम’ भिमगीत रजनी संगीत सोहळ्याचे आयोजन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
गुलामीच्या व्यवस्थेला मुहंतोड जवाब देण्याचं काम तत्कालीन प्रबोधनपर चळवळीतील कलावंतांनी, शाहिरांनी आणि गायकांनी करून प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारला त्यामुळे खचलेल्या, पिचलेल्या, उपेक्षित, वंचित समाजाला नवीन प्रेरणा आनि जगण्याचं बळ मिळालं आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम कलाकारांनी त्यावेळी केले असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी केले. न्यूज लोकमन व प्रयास सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित ‘एक शाम, भीम के नाम’ या संगीत रजनीचे उद्घाटन करताना डॉ.राजेश इंगोले हे बोलत होते.
यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य गौतम गायकवाड, प्रा.अनिल नरसिंगे, माजी नगराध्यक्ष लंकेश वेडे, दीपक वैद्य, पंकज मस्के, सचिन देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.इंगोले यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या एकाच वेळी एकाच गतीने एकाच दिशेला जात असतात क्रांतीला बळ देण्याचे काम कलाकारांनी युगानूयुगे केलेले आहे. हा इतिहास कलाकारांनी विसरला नाही पाहिजे असे सांगत सामाजिक बांधिलकी पाळत समाजासाठी प्रबोधनाचे कार्य कलाकारांनी अविरतपणे सुरू ठेवले पाहिजे अशी अपेक्षा व्यकत केली. पत्रकार संजय गायकवाड व प्राध्यापक महादेव माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंबाजोगाईतील गायक कलाकारांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि जनप्रबोधनाचे कार्य केले आहे त्याबद्दल डॉ.इंगोले यांनी त्यांचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी समजून सांगायला सामाजिक कार्यकर्त्यांना खूप वेळ लागतो, कलाकार दोन ओळीच्या गाण्यांमधून ते प्रबोधन आणि समुपदेशन प्रभावीरीत्या करू शकतात असे वक्तव्य डॉ.राजेश इंगोले यांनी केले. सत्कारमूर्ती उपप्राचार्य गौतम गायकवाड यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समाजासाठी अतुलनीय होते आणि हे कार्य समाजापुढे गाण्याच्या रूपाने मांडण्याचे काम कलाकार करीत आहेत ही गौरवाची गोष्ट आहे असे सांगत न्यूज लोकमन आणि प्रयास सामाजिक सेवाभावी संस्था यांनी आपला सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा.गौतम गायकवाड तसेच साधू गायकवाड व लंकेश वेडे यांची मुलं डॉक्टर झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आला तसेच लक्ष्मण गायकवाड या श्रमिकाचा मुलगा भारतीय लष्करात चांगल्या हुद्द्यावर रूजू झाला त्याबद्दल त्यांचाही सत्कार डॉ.राजेश इंगोले यांच्या तर्फे करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक रमेश शिरसाठ, डॉ.राजेश इंगोले लंकेश वेडे यांच्यातर्फे ही भीम संगीत रजनी आयोजित केल्याबद्दल आयोजक न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड तसेच प्रयास सामाजिक सेवाभावी संस्थेचे प्रा.महादेव माने यांचा सर्हदय सत्कार करण्यात आला. या भीम संगीत रजनीसाठी अंबाजोगाईचे स्थानिक कलाकार शाहीर गणेशमामा काळे, शाहीर तुकाराम सुवर्णकार सुप्रसिद्ध गायिका विद्या बनसोडे, प्रा.महादेव माने, बळीराम उपाडे, प्रा.राजकुमार ठोके, राहुल सुरवसे, प्रदीप चोपणे तसेच डॉ.राजेश इंगोले यांनी आपापली भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.महादेव माने यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शाहीर गणेश मामा काळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हारी जोगदंड, लखन जोगदंड, राहुल जोगदंड, माऊली नरसिंगे, शंकर गायकवाड, विशाल नरसिंगे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.