योगेश्वरी शिक्षण संस्थेस सैनिकी शाळा मंजूर….
अंबाजोगाई प्रतिनिधी:—
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळ गतिमान करण्यासाठी या विभागातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे हा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेस केंद्रीय रक्षा मंत्रालयाने सैनिकी स्कूल सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मराठवाड्यातील ७० शिक्षण संस्थांनी सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी रक्षा मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. अलीकडेच रक्षा मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनी या संदर्भात योगेश्वरी शिक्षण संस्था व मराठवाड्यातील इतर काही शिक्षण संस्थेस भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात चाचपणी केली होती.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने या अधिकाऱ्यांना महात्मा जोतिबा फुले वसतिगृहाशेजारील मोकळी जागा ही या नियोजित सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी दाखवण्यात आली होती. सदरील पाहणीस काही महिने पूर्ण झाल्यानंतर आज केंद्रीय रक्षा मंत्रालयाचे संस्थेस सैनिकी शाळा मंजूर झाल्याचे एक पत्र योगेश्वरी शिक्षण संस्थेस प्राप्त झाले आहे.अंबाजोगाईत आनंदोत्सव योगेश्वरी शिक्षण संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली शिक्षण संस्था असून अजूनही या शिक्षण संस्थेने आजपर्यंत आपल्या नीतीमूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. एक शिस्तप्रिय, विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणूनच या संस्थेकडे आज ही आदराने पाहिले जाते. या संस्थेस सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी रक्षा मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर शहरातील विविध मान्यवरांनी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर कोषाध्यक्ष डॉ शैलेश वैद्य यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.