*महात्मा फुले स्मारक समिती तर्फे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी*
*छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यापूढे शत्रूही नतमस्तक झाले – डॉ.किरण चक्रे*
*इतिहासातील प्रकांड पंडित, अपराजित, महापराक्रमी राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज – डॉ.राजेश इंगोले*
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ज्यांच्या पराक्रमाने स्वराज्याची धुरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तेवढ्याच प्रेरणेने आणि ताकदीने चालविली गेली अशा पराक्रमी, तेजस्वी, स्वराज्याच्या धाकल्या धन्याने केवळ नऊ वर्षांत आठ शत्रूंबरोबर एकही लढाई हरली नाही असे पराक्रमी राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते असे वक्तव्य प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी केले.
महात्मा फुले स्मारक समिती तर्फे आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ते प्रमुख व्याख्याते म्हणून स्मारक स्थळी आयोजित अभिवादन सभेत बोलत होते. यावेळी विचारमंचावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले हे होते. पुढे बोलताना डॉ.चक्रे यांनी शिवपूर्वकालीन, शिवकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर घडलेल्या इतिहासाची सांगड घालत संपूर्ण घडामोडी उपस्थित शिवप्रेमी, शंभूराजे प्रेमी नागरिकांना उलगडून दाखवत प्रबोधन केले. अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉ.राजेश इंगोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवन आदर्शवत कसं जगायचं ते शिकवलं. तर, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मरायचं कसं हे उदाहरण जगासमोर ठेवलं. अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे युद्ध लढले तेव्हढेच युद्ध लढून सर्व लढाया जिंकणारा अपराजित योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते. इतिहासातील सर्वात शापित राजे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचे नांव येईल. कारण, तत्कालीन इतिहासकारांनी संभाजीराजांच्या कारकिर्दीला बदनाम करण्याचेच चुकीचे काम केले. परंतु, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा आधुनिक इतिहासकारांनी शोध घेतला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीला तोड नाही असे सर्वांना मान्य करावे लागले असे डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्ममहोत्सव महात्मा फुले स्मारक समितीच्या वतीने ढगेज क्लासेस मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आदित्य कदम यांनी केले. तर व्याख्याते म्हणून डॉ.किरण चक्रे यांनी विचार मांडले. अध्यक्षीय समारोप अत्यंत प्रभावी व अभ्यासू पद्धतीने डॉ.राजेश इंगोले यांनी केला. तर आभार सुनिल नरसिंगे यांनी मानले. या प्रसंगी संजय साळवे, डॉ.अनिल नरसिंगे, रत्नदीप गोरे, डॉ.मिलींद ढगे, प्रा.आदित्य कदम, भाऊराव गवळी, बि.के.मसने व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.