*सिने अभिनेते रितेश देशमुख व राजकिशोर मोदी यांच्या भेटीत विविध विषयांवर चर्चा*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):-
मराठवाड्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध सिने अभिनेते रितेश देशमुख तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची बाभळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कौटुंबिक भेटीत उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. राजकिशोर मोदी हे लोकनेते स्व विलासराव देशमुख यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची भेट विलासराव देशमुख यांचे सुपुत्र सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी भेट झाली. या भेटी दरम्यान त्यांच्यात राजकीय, सामाजिक तसच सांस्कृतिक विषयावर सांगोपांग चर्चा झाली.
रितेश देशमुख यांच्या येऊ घातलेला छत्रपती शिवाजी या चित्रपटा विषयी माहिती देतांना रितेश देशमुख यांनी सांगितले की हा चित्रपट जवळपास सहा भाषांमध्ये येणार असून त्याचे स्वरूप हे भव्यदिव्य अशा स्वरूपात असणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जीनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडकर हे प्रमुख भूमिकेत असल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले. सदरील चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषेत हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल राजकिशोर मोदी यांनी रितेश देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमला (मुंबई फिल्म कंपनी) मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर स्व.विलासरावजी देशमुख यांचे अंबाजोगाई करांविषयीचे नाते याविषयी अतिशय दिलखुलास पणे चर्चा झाली.
रितेश देशमुख यांनी देखील संपूर्ण अंबाजोगाई वासीयांचे आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यासोबतच त्यांनी अंबाजोगाईकरांची अतिशय जिव्हाळ्याची अशी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक तथा बँकेच्या व्यवहाराबद्दल, तसेच मोदी लर्निंग सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध शैक्षणिक संस्थाबद्दल देखील आपुलकीने चौकशी केली. यादरम्यान अभिनेते रितेश देशमुख यांना अंबाजोगाई शहरात येण्याचे निमंत्रण राजकिशोर मोदी यांनी दिले असतांना रितेश यांनी शूटिंग नसल्यास अथवा पूर्वनियोजित काही कार्यक्रम नसल्यास अंबाजोगाईला नक्की येईन अशी ग्वाही याप्रसंगी दिली.