*स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा प्रकरणी सरकारने संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी – इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ.राजेश इंगोले*
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या सरकारी स्टाफ नर्स नियुक्ती प्रकरणी झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आणि भ्रष्टाचारा संदर्भात राज्य सरकारने त्वरित एसआयटी चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ.राजेश इंगोले यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला केली आहे.
याप्रकरणी डॉ.इंगोले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, राज्यात अपात्र उमेदवारांना लाच घेऊन अपुरे कागदपत्रे असताना जे पात्र उमेदवार नाहीत. त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कागदपत्रे पडताळणीसाठी मुंबईला बोलवून त्यांचा अर्थपूर्णरीत्या प्राधान्यक्रम भरून घेतलेला आहे व पात्र उमेदवारांना कसलीही कल्पना न देता अवैधरित्या या अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत. या नियुक्त्यांचा दर जवळपास २० ते ३० लाख रूपये ठरलेला आहे व अनेक अपात्र उमेदवारांनी ही रक्कम संबंधित आरोपींना दिलेली आहे. अपात्र असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्याला मान्यता देण्यासाठी डीएमईआर ऑफिसच्या बाजूला असलेल्या पडताळणी कार्यालयाने सहा लाखांची रक्कम घेतलेली आहे असे अनेक उमेदवारांनी नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार कोट्यावधी रूपयांचा असल्याची शंका आहे. ही प्रक्रिया पात्र उमेदवारांवर अन्यायकारक आहे व त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे या सबंध भरती प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशी करून संबंधित गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी अशी मागणी अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ.राजेश इंगोले यांनी एका निवेदनाद्वारे सरकारला केली आहे. याप्रकरणी शासनाने पारदर्शक पद्धतीने कार्यवाही न केल्यास अन्यायग्रस्त, पात्र डावललेल्या उमेदवारांच्या वतीने संघर्ष समिती स्थापन करून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही डॉ.राजेश इंगोले यांनी शासनाला कळविले आहे.