*अंबाजोगाई शहरातील वीज ग्राहकांचे बदलण्यात येणारे स्मार्ट मीटर बदलणे तात्काळ थांबवून शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- राजकिशोर मोदी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
अंबाजोगाई शहरातील वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय बदलण्यात येणारे नवीन स्मार्ट मीटर बसविणे त्वरित थांबवावे तसेच वीज बिलात विविध प्रकारच्या आकारण्या लावून ग्राहकांची केली जाणारी आर्थिक लूट थांबवावी त्याचबरोबर ग्राहकांना येत असलेली ज्यादा वीज बिल ते दुरुस्त करून बिले कमी करून देण्याची मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कार्यकारी अभियंता महावितरण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार अंबाजोगाई शहरात अचानक पणे ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांचे चालू असलेले जुने मीटर काढून त्याठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे. बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विषयी ग्राहकांना कुठलीही माहिती दिल्या जात नाही. त्यामुळे जुने मीटर काढून नवीन मीटर का बसविले जात आहे हा प्रश्न वीज ग्राहकात निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील वीजग्राहकात मोठया प्रमाणावर नाराजी तथा गैरसमज निर्माण होत असल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.जुन्या मीटरची रीडिंग नवीन मीटर च्या बिलात देत असताना जुन्या व नवीन रीडिंगचा ताळमेळ कुठेच लागत नाही. पर्यायाने शहरातील वीज ग्राहकांना ज्यादा बिलाची आकारणी केल्या जात आहे त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापुढे ग्राहकांना त्यांचे वीज बिल देतांना योग्य ती काळजी घेऊन ग्राहकाचे समाधान करून बिल द्यावे जेणेकरून ग्राहकांची आर्थिक लूट होणार नाही. त्याचबरोबर वीज बिलामध्ये प्रत्येक महिन्याच्या बिलात विविध प्रकारच्या छुप्या आकारण्या लावून बिलाची रक्कम वाढविली जात आहे. याचा देखील भार ग्राहकांच्या माथी दर महिन्याला मारला जात असून यामुळेही ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे.तेव्हा अशा प्रकारे होत असलेली वीज ग्राहकांची आर्थिक लूट तात्काळ थांबवण्याची मागणी राजकिशोर मोदी यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
सदर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित बंद करावे , ज्या ग्राहकांच्या ज्यादा बील आल्याच्या तक्रारी असतील त्या तक्रारींच्या चौकशी करून त्वरित त्यांचा निपटारा करावा, तसेच वीज बिलातील स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क अशा प्रकारच्या सर्व छुप्या शुल्काची आकारणी बंद करून ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांना वितरित करावे अशी मागणी मोदी यांनी करताना दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास जनहितार्थ आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राजकिशोर मोदी व त्यांच्या उपस्थित सर्व सहकार्यांनी कार्यकारी अभियंता महावितरण अंबाजोगाई याना दिला आहे . या निवेदनावर राजकिशोर मोदी यांच्यासह मनोज लखेरा, महादेव आदमाणे, सुनील वाघाळकर, दिनेश भराडीया,धम्मा सरवदे, अंकुश हेडे, खलील जाफरी, सय्यद रशीद, आकाश कऱ्हाड, दत्ता सरवदे, रफीक गवळी,मतीनं जरगर, कैलास कांबळे, तौफिक सिद्दीकी, संतोष चिमणे, शरद काळे,यांच्यासह अनेक सहकारी बांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.