*चनई जिल्हा परिषद सर्कलमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरु* ; *सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने उमेदवारात रस्सीखेच*
* दिपक शिंदे, बाळासाहेब सोनवणे, ऍड सतीश केंद्रे, शंकर उबाळे, तानाजी देशमुख, यांची नावे आघाडीवर*
अंबाजोगाई प्रतिनिधी
*परमेश्वर गित्ते* *अशोक दळवे*:–
येत्या दोन ते तीन महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्याची प्रक्रिया सुरु झाली असून नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. आरक्षण प्रक्रिया पुढील महिन्यात होणार असली तरी आपआपल्या मतदारसंघात जनसामान्यांची आपल्या विषयी काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. चनई जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी उपसभापती तानाजी देशमुख, भाजपकडून माजी जि.प.सदस्य शंकर उबाळे, अॅड.सतिश केंद्रे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युवा नेते दिपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. चनई जिल्हा परिषद सर्कलची यावेळची निवडणुक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.
तालुक्यामध्ये चनई जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेल्या वेळी म्हणजे 2017 साली झालेली निवडणुक अटीतटीची व प्रतिष्ठेची झाली. कारण शंकर उबाळे व दिपक शिंदे यांच्यात जोरदार लढाई दिसून आली. अवघ्या 282 मतांनी उबाळे यांचा विजय झाला. दिपक शिंदे हे त्यावेळपासून आजपर्यंत फिल्डवर काम करीत आहेत. चनई जिल्हा परिषद सर्कमध्ये प्रामुख्याने मराठा व वंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या खालोखाल मुस्लिम व बौध्द आहेत. परंतु विजयासाठी जी निर्णायक आघाडी मिळणार आहे ती आघाडी प्रामुख्याने मराठा आणि वंजारा मतदार देणार आहे. या मतदारसंघातून यावेळी अनेकजण लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि मोठ्या प्रमाणात बंड होण्याची शक्यता सुद्धा आहे. कारण गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषदेची निवडणुक झालेली नाही. शिवाय अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने आणि मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कोणी आता थांबायला तयार नाही. त्यानुषंगाने यावेळची निवडणुक अटीतटीची व प्रतिष्ठेची होणार आहे. उमेदवारी मिळविण्यापासूनच मोठा संघर्ष पाहवयास मिळणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून डिघोळअंब्याच्या सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचे नाव पुढे आले आहे. सरपंच म्हणून त्यांनी गेल्या दहा वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. शिवाय डिघोळअंबा हे गाव विकासाचे मॉडेल म्हणून पुढे आणले आहे. शिवाय तालुक्यामध्ये व पंचक्रोशीत त्यांचा जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा वेगळा वर्ग आहे. शिवाय माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे निकटचे स्नेही आहेत आणि या मतदार संघात मराठा समाज व वंजारा समाज ज्यांचा प्रभाव असल्याने ते विजयी होवू शकतात असा व्होरा अनेकांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. तर दुसरे उमेदवार तानाजी देशमुख यांचेसुद्धा नाव आघाडीवर आहे आणि त्यांचा दावा सुद्धा आहे. कारण पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. एक तरुण चेहरा म्हणून त्याचा लौकिक आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात त्यांचा चांगला समन्वय आहे. म्हणून त्यांचा दावा प्रभावी मानला जातो आहे. भाजपाकडून प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांचे नाव पुढे आले आहे. एक शांत, संयमी चेहरा अध्यात्म आणि सांप्रदायावर पगडा असलेले शंकर उबाळे हे मृदु आणि शांत स्वभावाचे आहेत सरपंच म्हणून व जिल्हा परिषद सदस्य म्हणून उत्कृष्ट काम त्यांच्या हातून झालेले आहे ग्रामपंचायतचा कारभार करत असताना त्यांनी पेरे पाटील व पोपटराव पवार यांना आदर्श मानून आपले काम केले आहे. त्यांच्या कार्यकालात सनगाव ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनसुद्धा उत्कृष्ट काम केलेले आहे. म्हणून सकारात्मक विचार असलेल्या चेहर्याचा विचार भाजपाकडून होवू शकतो व विशेष म्हणजे आ.नमिताताई मुंदडा यांचे जवळचे स्नेही म्हणून त्यांची ओळख आहे. तर भाजपाकडूनच माजी पंचायत समिती सदस्य अॅड.सतिश केंद्रे यांचेसुद्धा नाव पुढे येत आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. ना.पंकजाताई मुंडे यांचे निष्ठावंत सैनिक म्हणून ओळख आहे. पंचक्रोशीत त्यांचा प्रभाव आहे. म्हणून सतिश केंद्रे यांचे नाव पुढे आले आहे.या उपरही पक्ष नेतृत्व उबाळे, केंद्रे यांच्याशिवाय वेगळा उमेदवार देवू शकतो अशीही चर्चा या सर्कलमध्ये सुरु आहे ज्यामध्ये उद्योजक प्रदिप ठोंबरे किंवा भूषण ठोंबरे यांचा विचार होवू शकतो. परंतु या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. याच सर्कलमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडून दिपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे आणि त्यांचीच उमेदवारी अंतिम होईल अशी शक्यता आहे. कारण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिपक शिंदे यांचा प्रभाव चांगला राहिलेला आहे. मोठ्या तळमळीने उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. लोकसभेला चांगले यश मिळाले तर विधानसभेला काटावर ही निवडणुक हारलेली आहे. त्यामुळे दिपक शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार हेे स्पष्ट आहे शिवाय खा.बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांचीच उमेदवारी अंतिम होईल असे मानले जाते कारण गेल्या निवडणुकीत अवघ्या 282 मतांनी पराभूत झालेले आहे त्यामुळे शिंदे यांच्याविषयी सहानुभुती आहे. कार्यकर्त्यांचा मोठा संचय आहे. त्यामुळे त्यांना विजयाची आशा आहे. एकूणच चनई सर्कलमधून इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या परिने जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे काहींनी एजन्सीच्या माध्यमातून सर्वे सुरु केला आहे तर काहींनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे एकूणच चनई जिल्हा परिषदेची निवडणुक यावेळी अटीतटीची व प्रतिष्ठेची होईल असे दिसते आहे. तर पंचायत समिती गणातून अनेक नावे पुढे आहेत ज्यामध्ये भाजपाकडून भिमराव केंद्रे यांच्या नाव पुढे आहे परंतु यावेळी त्याठिकाणी युवा नेते व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अनिल किशनराव केंद्रे यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे कारण मुंदडा घराण्याशी अनिल केंद्रे व त्यांच्या कुटूंबियांचे सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गटाकडून इछुक उमेदवार पुढे आलेले नाहीत. येणार्या काळात अनेक इच्छुक उमेदवार पुढे येतील.