अंबाजोगाई (प्रतिनिधी) –
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री अक्षय प्रमोद खरटमोल आणि कॅशियर श्री तुषार दयानंद साठे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला.
या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती.जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सिद्धार्थ नगर, अंबाजोगाई ही संस्था गेली 15 ते 20 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रीय आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 2022-23 या वर्षी या संस्थेला प्रतिष्ठेचा ‘शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
या उपक्रमात आणखी एक सामाजिक जाणीव असलेली गोष्ट घडली – उपाध्यक्ष अक्षय खरटमोल यांनी आपला वाढदिवस धायगुडा पिंपळा येथील ‘भक्तीप्रेम वृद्धाश्रम’ येथे स्नेहभोजन देऊन साधेपणाने वाढदिवस साजरा केला. कुटुंबीयांसह वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक अनोखा आदर्श त्यांनी उभा केला.
या उपक्रमाबाबत जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रमुख अविनाश साठे म्हणाले, “आमच्या कार्याचा परिणाम आज अशा तरुणांच्या कृतीतून दिसत आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना हेच आमच्या कार्याचे यश आहे. युवकांनी अशा पद्धतीने सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे.”अशा सकारात्मक उपक्रमांमुळे समाजात आशेचा नवा किरण निर्माण होतो आहे. युवकांनी सामाजिक जाणिवेतून उभारलेले हे उपक्रम समाजासाठी नवा आदर्श घालून देणारे ठरत आहेत.