अंबाजोगाई प्रतिनिधी :-
रविवार दिनांक 03 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन व चमत्कार सादरीकरण कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या प्रसंगी अंनिस कायकर्ते हेमंत धानोरकर यांनी समाजातील विविध अंधश्रद्धाबाबत जनजागृती करताना विज्ञानाचे विविध प्रयोग सादर करून चमत्कारामागील विज्ञानाचे स्पष्टीकरण दिले.
या कार्यक्रमात धानोरकर सरांनी लंगर सोडवणे, रिकाम्या हातातून चेन काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे, पेटलेला कापूर खाणे, जिभेत त्रिशुळ घुसवणे, पाण्याची साखर बनवणे असे अनेक प्रयोग दाखवून त्यातील हातचलाखी व विज्ञान याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद करत त्यांना विषारी सापांबाबत माहिती सांगितली. जादुटोणा व अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम 2013 या कायद्याबाबत जनजागृती करून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी चळवळीत सहभाग घेण्याचे आवाहन धानोरकर सरांनी केले.
वस्तीगृहाचे अधीक्षक सुनील बनसोडे सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष बनसोडे सर, प्रमुख पाहुणे धानोरकर सर आणि एस.एफ.आय. चे प्रतिनिधी अविष्कार गीता बळीराम यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून वेळेचे नियोजन करणे, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन करणे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे धडाडीचे तरुण कार्यकर्ते प्रथमेश मीरा जगन्नाथ, सुमित मीरा अशोक आणि
अविष्कार गीता बळीराम यांनी अत्यंत उत्कृष्टपणे कार्य केले.