अंबाजोगाई प्रतिनिधी:–
तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या चि. बिराजदार अभिषेक या विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर, थेट द्वितीय वर्षास महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. मराठवाड्यातून ऑटोमोबाईल विभागातून पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सीओईपी येथे प्रवेश मिळवणारा चि. अभिषेक बिराजदार हा एकमेव विद्यार्थी आहे. त्याचबरोबर तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या चि. भांगे ज्ञानेश्वर या विद्यार्थ्याने VJTI, Mumbai, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या चि. दळवे परमेश्वर याने सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय,अंधेरी या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये चि. दळवे परमेश्वर व चि. बिराजदार अभिषेक या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षांत, तसेच प्रथम वर्षात शिकणाऱ्या 20 विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण संपादित करून, महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे..विद्यार्थ्यांच्या या यशामुळे योगेश्वरी पॉलिटेक्निक तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले आहे.
मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षीत करण्याच्या उद्देशाने डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या प्रेरणेतून वर्ष २०११ साली योगेश्वरी पॉलिटेक्निक या महाविद्यालयाची स्थापना झाली. कौटुंबिक परिस्थितीमुळे जर एखादा गरीब विद्यार्थी जर शिक्षणाकडे जाऊ शकत नसेल तर शिक्षणाने त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे. या उद्देशाने पॉलिटेक्निक विभागाने गेल्या १४ वर्षात भरीव शैक्षणिक कार्य केले आहे. महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा व गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेतील सर्व प्राध्यापक व कर्मचारी सतत प्रयत्नशिल असतात.विद्यार्थी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलासोबतच, सर्व सोयीयुक्त वसतिगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
संस्थेमध्ये स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागाच्या वतीने अंतर्गत विविध कंपन्यांना आमंत्रित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम संपण्यापूर्वीच नोकरी उपलब्ध करून देण्यात येते. यापूर्वीही शेकडो विद्यार्थी या अंतर्गत विविध कंपन्यांमध्ये रुजू झाले आहेत..
विद्यार्थ्यांच्या यशामागे विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे व सर्व शिक्षकीय कर्मचा-यांनी मेहनत घेतली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री .गणपत व्यास, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, संचालक श्री.प्रताप पवार यांनी अभिनंदन केले आहे. अशी माहिती कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी दिली.