अंबाजोगाई प्रतिनिधी : तालुक्यातील कुंबेफळ येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहिल संतोष शिंदे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्याला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) दुपारी गावालगतच्या तळ्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवला. साहिलने आत्महत्या का केली, यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. कुंबेफळ परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.