अंबाजोगाई प्रतिनिधी :- अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चनई गावाजवळ आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याने पायी जात असलेल्या अंदाजे 25 ते 30 वयोगटातील एका अनोळखी तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले.अपघातात मृतदेहाचा चेंदामेंदा झाल्याने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात हलवला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अंबाजोगाई पोलिसांकडून पलायन केलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे.
या अपघातामुळे चनई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धोकादायक वेगाने वाहन चालवणाऱ्या बेफिकीर वाहनचालकांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.