अंबाजोगाई प्रतिनिधी :-
जल ही जीवन हे या ब्रीदनुसार अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवल कमिटीने तहसील कार्यालयास उपलब्ध करून दिलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकार्पण केले. या जलशुद्धीकरण यंत्राचा (वॉटर प्युरीफायर) लोकार्पण सोहळा अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार विलास तरंगे यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, सचिव प्रा अशोक लोमटे , यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सहसचिव संजय भोसले, कोषाध्यक्ष शिरीष पांडे त्याचबरोबर संतिष लोमटे, प्रवीण दामा, राजाभाऊ लोमटे, अमोल लोमटे, अंबाजोगाई शहराचे तलाठी संजय चव्हाण हे उपस्थित होते.
अंबाजोगाई तालुक्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक येथे आपल्या शासकीय कामासाठी येतात . खेड्यापाड्यातुन येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामासाठी अनेक वेळा दिवस दिवस थांबावे लागते. त्यांना यावेळी पाणी पिण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. येथील सामाजिक भान ठेवून काम करणारे तहसीलदार विलास तरंगे यांच्या कानावर ही बाब येताच त्यांनी तात्काळ पाण्याच्या जारची व्यवस्था केली. मात्र आणलेल्या जारनेही पाणी पिण्याची समस्या सुटत नसल्याचे दिसून येताच त्यांनी श्री योगेश्वरी देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे सर्व विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ही बाब मांडली. तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची पाण्यावाचून होत असलेली फरफट लक्षात घेऊन सर्व संचालक मंडळाने अंबाजोगाई तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी थंड व शुद्ध करणारी कायमस्वरूपी जलशुद्धीकरण यंत्रणा ( वॉटर प्युरीफायर) बसविण्याचा ठराव संमत केला.
त्यानुसार दि१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई तहसील कार्यालयात बसविण्यात आलेल्या दीड लाख रुपये किमतीचे व ३०० लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण सर्व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या जलशुद्धीकरण यंत्रामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यंगतांची पिण्याच्या थंड व शुद्ध पाण्याची सोय होणार आहे. विविध शासकीय योजनेसाठी तहसील कार्यालयात येणारे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करून दिल्याबद्दल तहसीलदार विलास तरंगे यांनी श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या सर्व विश्वस्तांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्या सर्वांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी तहसीलदारांनी तहसील कार्यालयात केलेले आधुनिकीकरण व ग्रंथालय पाहून तहसीलदार विलास तरंगे यांचे देवल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचे कौतुक करत त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होवो अशा शुभेच्छा दिल्या.