अंबाजोगाई प्रतिनिधी:
बीड जिल्यातील आंदोलनात तनावाचे वातावरण असल्या कारणाने आज अंबेजोगाई मध्ये आंदोलन चालूच ठेवण्यात आले असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमितीकरणाच्या आपल्या मागणीसाठी १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत निर्णय घेण्यात आला होता, मात्र सव्वा वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने केला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर सेवेचा ताण वाढला होता.
काय आहेत मागण्या?
१० वर्षे सेवा झालेल्यांचे १०० टक्के समायोजन करावे, ते होईपर्यंत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करून नियमितप्रमाणे वेतनवाढ द्यावी, रिक्त जागांवर समायोजन न झाल्यास अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करावे, ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३ मधील आंदोलनातील गुन्हे रद्द करावेत, ज्यांची सेवा १० वर्षे पूर्ण झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांची नावे नियमित समायोजन प्रक्रियेत समाविष्ट करावीत, सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा उल्लेख केला होता.तसेच, ८ जुलै २०२५ रोजी आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन समायोजन प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे यापूर्वीचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात काही अधिकारीही सहभागी झाले होते.सकाळी जिल्हा रुग्णालयात एकत्रित आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात घोषणाबाजी केली. त्यानंतर याच कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केले. यात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होते. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.