धानोरा खुर्द ते देवळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक बंद
धानोरा परिसरात सतत पाऊस, शेतात पाणीच पाणी, ऊसही आडवा
धानोरा प्रतिनिधी अशोक कोळी :-
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून धानोरा खुर्द ते देवळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीन सह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
धानोरा खुर्द परिसरात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू असून या पावसामुळे सोयाबीन सह इतर पिके धोक्यात आली आहे. सोयाबीन मध्ये पाणी साचून शेंगा नासुन जात आहेत. जून मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन पीक काढणीच्या जवळपास आले आहे. सतत पाऊस पडत असल्याने शेतामध्ये पाणी साचून आहे. पाणी साचल्यामुळे सोयाबीन च्या शेंगा नासुन जात आहेत. नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत. मांजरा धरण भरल्यामुळे पाण्याचा सतत विसर्ग सुरू आहे. मांजरा धरणातून मांजरा नदीला विसर्ग सुरू असल्यामुळे छोट्या नदी नाले ओढयाचे पाणी नदीपात्रात घेत नसल्याने नदीकाठी शेती जलमय झाली आहे. वाऱ्यासह पाऊस असल्यामुळे उसाचे पीक देखील आडवे पडले आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्याच्या हातून जात असून शेतकरी हातबल झाले आहेत. तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
धानोरा खुर्द ते देवळा रस्त्यावरील ओढयावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इंजिनिअर गोविंद शेळके यांनी पुलाची पाहणी केली असून या रस्त्यावरून नागरिकांनी ये-जा करू नये .पुल वाहून गेल्याने वाहन चालकांनी या रस्त्यावरून वाहतूक करू नये असे आव्हान त्यांनी केले आहे. पाऊस उघडताच पूल दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात येईल असे त्यांनी सकाळी बोलताना सांगितले.धानोरा देवळा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. पुल वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.पुलाचे काम तात्काळ करावे अशी आमची मागणी आहे.देवळा गावातील शेतकऱ्यांनी शेतात परिसरातील नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यासाठी या रस्त्यावरून जाऊ नये. दत्ता साळुंके उपसरपंच देवळा ता. अंबाजोगाई