अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाईत कालपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी – नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अंबाजोगाई परिसरात पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली गेली आहेत. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या गावांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वान नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले : ग्रामस्थ त्रस्त, नव्या पुलाची मागणी
अंबाजोगाई तालुक्यातील वान नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना तासनतास दोन्ही बाजूंना अडकून राहावं लागत आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, हा पूल गेल्या कित्येक वर्षांपासून खचला असूनही अद्याप त्याची दुरुस्ती किंवा नवा पूल उभारण्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, आजारी रुग्ण तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ‘पूल कधी बांधणार ? असा थेट सवाल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना केला असून लवकरात लवकर नवा पूल बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे.