अंबाजोगाई (प्रतिनिधी) –
“वेगाने बदलणाऱ्या आधुनिक युगात महिला अबला नसून सबला झाली पाहिजे. प्रत्येक स्त्री ही देवीचे रूप आहे आणि स्त्रीशक्ती हेच सशक्तीकरणाचे ऊर्जा स्तोत्र आहे. खोलेश्वर परिवाराने माझा सन्मान केला हे माझं भाग्य समजते,” असे उद्गार योगेश्वरी देवल कमिटीच्या कोषाध्यक्षा व समाजसेविका सौ. पूजा ताई कुलकर्णी यांनी काढले.
शतकाचे तेज व अमृताची ऊर्जा रुपी शारदा उत्सव निमित्ताने खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. बिभीषण फड यांनी भूषविले. मंचावर उपप्राचार्य गौतम गायकवाड, डॉ. रवींद्र कुंबेफळकर, उपप्राचार्य आनंद पाठक तसेच प्रा. अनिता बर्दापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पूजाताई कुलकर्णी यांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना पूजाताई म्हणाल्या की, “खोलेश्वर महाविद्यालयात आयोजित होणारे उपक्रम हे संस्कार घडविणारे आहेत. या परिवाराचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे. महाविद्यालय नेहमीच चांगले आणि उपयुक्त उपक्रम घेते, त्याचे मी मनापासून कौतुक करते.”
कार्यक्रमात गृह विज्ञान विभाग आयोजित आईस्क्रीम मेकिंग सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत झालेल्या स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. फड यांनी महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती देताना महिला आज सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात मोठी प्रगती करत असल्याचे सांगितले. तसेच योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या कोषाध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल पूजाताईंचे अभिनंदनही केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तृप्ती पडेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मृणाल गोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन आशालता कलमे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर मुलींसाठी दांडिया स्पर्धेचे आयोजन करून उत्सवाला अधिक रंगत आणण्यात आली. ✨