तथागत गौतम बुद्ध ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा अलौकिक इतिहास – प्रा.डॉ.कीर्तिराज लोणारे*
*महात्मा फुले स्मारक समिती तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील महात्मा फुले स्मारक समिती तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर स्मारक समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, प्रमुख व्याख्याते म्हणून पाली इतिहास संशोधक प्रा.डॉ.कीर्तीराज लोणारे, कार्यकारी अध्यक्ष प्रा.बी.के.मसने, उपाध्यक्ष प्रा.डॉ.अनिल नरसिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. यावेळी महापुरूषांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी भारताचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कशा बदलत गेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राष्ट्रनिर्माते म्हणून भूमिका यावर विवेचन करीत महापुरूषांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम महात्मा फुले स्मारक समिती करीत आहे असे प्रतिपादन केले. तर प्रा.बी.के.मसने यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे बहुजन समाजाला न्याय मिळाला आहे सामाजिक प्रवाहामध्ये स्थान मिळालेले आहे त्यामुळे साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी यांनी संविधान निर्मात्याचे उपकार मानायला हवे अशा शब्दांत परखड मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याता प्रा.कीर्तीराज लोणारे यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या काळात मानवतेचे मूल्य जपणाऱ्या, माणसांमध्ये प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या,जाती, धर्म, लिंग, भेद याला कसलेही स्थान न देणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगामध्ये कसा झाला. तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाला. कलिंग युद्धानंतर झालेल्या विनाशा नंतर सम्राट अशोकाला शांतीचे महत्त्व कळाले, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे महत्त्व कळाले आणि जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा या प्रेरणेने सम्राट अशोकाने जगभरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. सम्राट अशोकानंतर अनेक राजकीय उलथापालथी अनेक परकीय आक्रमणे यामध्येही बौद्ध धम्म आपले अस्तित्व टिकवून ठेवले.याचे कारण सम्राट अशोकाने जी शिलालेखे जी बौद्ध मंदिरे बौद्ध स्तूप गुहालेखे याद्वारे बौद्ध धम्माचे विचार दगडांवर कोरून ठेवले त्यामुळे बौद्ध धम्म भारतामध्ये टिकून राहिला. त्यानंतर सर्वांत मोठी क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे आणि चिकित्सेनंतरच ती गोष्ट स्वीकारली पाहिजे असे सांगत मला तथागत गौतम बुद्ध व बौद्ध धम्माची शिकवण पटलेली आहे त्यामुळे मी बौद्ध धम्म स्वीकारत आहे. तुम्हालाही चिकित्सा करून जर हा धम्म पटत असेल तरच तुम्ही या धम्मामध्ये या असे भावनिक आवाहन केले होते. प्रा.कीर्तीराज लोणारे यांनी हा संपूर्ण इतिहास आपल्या सोप्या भाषेमध्ये अत्यंत मार्मिक आणि प्रभावीपणे मांडत श्रोत्यांची मने जिंकली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्या रसपूर्ण शैलीत तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य समता, बंधुता आणी न्याय ही मानवी मूल्य जोपासणारे विचारांची माळ आहे भारतीय इतिहासात या सर्वांचा नाम उल्लेख झाल्याशिवाय ही कडी पूर्ण होऊ शकत नाही असे गौरवोदगार काढले. डॉ.इंगोले यांनी स्वातंत्र्यपूर्व भारत, स्वातंत्र्यानंतरचा भारत, डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याआधीचा समाज आणि दीक्षा घेतल्यानंतरचा समाज अशी मांडणी करत यावर सविस्तर विश्लेषण केले. आपल्या मार्मिक प्रभावी भाषणामध्ये त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाकडून काय अपेक्षा केली होती आणि समाज नेमके काय करतो आहे यावर भाष्य केले. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतरचा समाज हा जबाबदार असायला हवा होता. या समाजाने बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शन करत मोठ्या भावाच्या भूमिकेत असायला हवे होते. परंतु, दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली ही गोष्ट साध्य झाली नाही आणि त्यामुळे डॉ.आंबेडकरांचे, सारा भारत बौद्धमय करेल हे स्वप्न अपूर्ण राहिले. समाजाची प्रगती जर करायची असेल तर आपल्याला शासनकर्ती जमात बनावे लागेल हे डॉ.आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. परंतु, बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजले नाही त्यामुळे हा समाज आजही विज्ञानाला सहजासहजी न स्वीकारता परंपरेने आलेले विचार अंधश्रद्धा हे सहजपणे पाळतो ज्या चिखलातून डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला वर काढण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने मानसिक गुलामगिरीमुळे बहुजन समाज परंपरेच्या जोखडात जखडून जाऊन हतबल झाल्याचे चित्र आजही पहावयास मिळते. हे चित्र जर बदलायचे असेल तर शिक्षित समाजाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा लढा उभारत गुलामगिरीचे जीवन जगत असलेल्या बहुजन समाजाला सामाजिक प्रवाहात आणले आणि गुलामगिरीचा जोखडातून त्यांना मुक्त केले हा जगातला सर्वांत मोठा मानवी मुक्तीचा लढा व क्रांती होती असे प्रतिपादन डॉ.इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल नरसिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.मिलिंद ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.