
*~ जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, शहराध्यक्ष महादेव आदमाने व उपाध्यक्ष रशिदभाई सय्यद यांचे आवाहन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणुक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण व प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांच्या देखरेखीखाली अंबाजोगाई शहराचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी मोठ्या ताकदीने लढविणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी मागणी अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, शहराध्यक्ष महादेव आदमाने व उपाध्यक्ष रशिदभाई सय्यद यांनी केले आहे.
अंबाजोगाई शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई शहरच्या प्रमुख पदाधिकारी आणि नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी मागणी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर आणि बुधवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई संपर्क कार्यालय, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, अंबाजोगाई (जि.बीड.) येथे दाखल करावेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई शहर महासचिव प्रा.शैलैष जाधव (मोबाईल – ९०७५५५४७७७) हे दिलेल्या वेळेत उपस्थित राहून सदरचे अर्ज स्विकारतील. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शहराध्यक्ष महादेव आदमाने व उपाध्यक्ष रशिदभाई सय्यद हे म्हणाले की, अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वच प्रभागात अतिशय ताकदीचे सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा आठरापगड जाती धर्मातील वर्ग अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस व अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्याच धर्तीवर आगामी काळात देखील संपूर्ण अंबाजोगाई शहर हे राष्ट्रवादीमय करून शहराचा सर्वांगीण विकास करून अंबानगरीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, शहरातील विविध प्रभागातील जनतेला पुन्हा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे यांच्या माध्यमातून त्यांचे सर्वच प्रभागातील सहकारी सज्ज झाले आहेत. अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडे विविध क्षेत्रातील निष्ठावान कार्यकर्त्यांची अतिशय मजबुत व खंबीर अशी फळी उपलब्ध आहे. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विविध माध्यमांतून सातत्यपूर्ण केलेली सेवा जनता अद्याप विसरलेली नाही. मोदी हे सर्व जनतेला सहज उपलब्ध होणारे जनसेवक आहेत. अंबाजोगाई शहरात शांतता, सौहार्द, एकोपा, सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. असे जनतेचे मत बनले आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वस्तरांतील जनतेचा ओघ वाढला आहे. व त्यामुळेच की, काय माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांना अंबाजोगाई शहरात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
