
अंबाजोगाई प्रतिनिधी :-अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीनंतर दोन्ही आघाड्यांकडून स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले होते. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून लोकविकास महाआघाडीकडून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांची, तर परिवर्तन जनविकास आघाडीकडून संजय गंभीरे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
लोकविकास महाआघाडीकडून मोदी आणि लोमटे यांची नावे स्वीकृत सदस्यांसाठी आधीपासूनच कन्फर्म मानली जात होती. मात्र परिवर्तन जनविकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी आणि ॲड. संतोष लोमटे यांची नावं चर्चेत असतानाही राजकीय घडामोडीं बदलत संजय गंभीरे यांचे नाव पुढे आले. अखेर आज त्यांच्या अंतिम निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, लोकविकास महाआघाडीकडून राजकिशोर मोदी आणि बबन लोमटे यांची स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून नगरपरिषदेत एंट्री झाल्याने येत्या काळात नगरपरिषदेत सत्तासंघर्ष तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांना नगरपरिषदेचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.
माजी नगरसेवक शेख रहिम यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम यांना परिवर्तन जनविकास आघाडीकडून डावलण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. तशा आशयाच्या पोस्ट देखील समाजमाध्यमांवर दिसून येत आहेत. दरम्यान, आता परिवर्तन जनविकास आघाडीचे नेते त्यांची मनधरणी कशी करतात, हे येणारा काळचं ठरवेल. परंतू, शेख रहीम यांना डावलण्याची चर्चा मात्र शहरात दिसून येत आहे.
