
अंबाजोगाई प्रतिनिधी -: अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात
कॅथलॅब व कॅन्सर उपचार युनिट उभारणीसाठी पाठपुरावा करू. अशी ग्वाही आयुष्मान भारत मिशन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
मंगळवारी दुपारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत डॉ. ओमप्रकाश शेटे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचे आयुष्मान कार्ड वितरित झाले आहेत. शासन सामान्य रुग्णांना आयुष्मान च्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आगामी काळात स्वतंत्र कार्डीओलोजी विभाग व कॅथलॅब, कॅन्सर उपचार युनिट, साधे, गुडघे बदलाची शस्त्रक्रिया अशी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या १५० सीट वरून त्या २५० कशा होतील. तसेच डॉक्टरांच्या व इतर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा,प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरविंद बगाटे, डॉ. चंद्रकांत चव्हाण,डॉ.राजेश कचरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
