
अंबाजोगाई (प्रतिनिधी):
स्वामी रामानंद तीर्थ (स्वा. रा. ती.) ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथील बाह्यरुग्ण (ओपीडी) चिठ्ठी विभागात सुट्ट्या पैशांच्या कारणावरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वीस रुपयांची ओपीडी चिठ्ठी काढण्यासाठी रुग्ण नातेवाईकांनी शंभर किंवा पन्नास रुपयांची नोट दिल्यास संबंधित कर्मचारी सुट्टे पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “सुट्टे नाहीत, नंतर या” असे सांगून रुग्णांना परत पाठवले जाते. मात्र तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचारी ड्युटी संपवून निघून जातात. परिणामी, रुग्ण नातेवाईकांना दिलेल्या रकमेचे उर्वरित पैसे मिळत नाहीत. अनेक वेळा रुग्णांची तपासणी, औषधोपचार व इतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चिठ्ठी विभागातील कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे.
गरीब, शेतकरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी वीस-तीस रुपयेही महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीत सुट्ट्या पैशांच्या कारणावरून होणारी ही अडवणूक म्हणजे आर्थिक पिळवणूकच असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागात पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी, सुट्ट्या पैशांची स्वतंत्र सोय करावी किंवा डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचे आधारस्थान असताना अशा प्रकारांमुळे रुग्णांचा विश्वास डळमळीत होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
रुग्ण नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
