
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहरात गेल्या 13 वर्षापासून अखंडित व अविरतपणे मधुमेही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. अतुल शिंदे यांना राष्ट्रीय स्तरावर मधुमेही रुग्णांसाठी काम करणाऱ्या डायबिटीज इंडिया संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील डायबिटीज अवेरनेस इनिशिएटिव अवॉर्ड – 2026 नुकताच जाहीर करण्यात आला होता त्याचे वितरण शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ.अतुल शिंदे यांचे मधुमेह क्षेत्रातील कार्य हे अतुलनीय ठरल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

डॉ.अतुल शिंदे यांनी १३ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागात योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर या नावाने पायाभरणी केली. 13 वर्षाची अखंड मेहनत व मधुमेही रुग्णांना सातत्याने केलेले समुपदेशन यामुळे रुग्णांमध्ये मधुमेह रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले.डॉ.अतुल शिंदे हे केवळ एवढ्यावर थांबले नाहीत तर दरवर्षी मधुमेह दिनानिमित्ताने अंबाजोगाई तालुका व परिसरातील जे गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोफत रक्त तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधी दिली जातात.गेल्या तेरा वर्षात हजारो रुग्णांना डॉ. शिंदे यांच्यामुळे मधुमेह नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. वैद्यकीय सेवेसोबतच निस्वार्थपणे गरीब रुग्णांना मोफत सेवा ते देत असतात.मधुमेह आजारासंबंधी आपल्या परीने ते जनजागृती करत असतात. त्यासोबतच शहर व परिसरातील जी गावे आहेत त्या गावांमध्ये वेगवेगळे सण, उत्सव व महामानवांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित शिबिरांमध्ये उपस्थिती लावून रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतात.मधुमेह आजारासंबंधी कमालीचे जागरूक असलेल्या डॉ .अतुल शिंदे यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत असते परंतु मधुमेहाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डायबेटीज इंडिया या संस्थेने डॉ.अतुल शिंदे यांच्या निस्वार्थ कार्याचा अभ्यास करून त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा डायबिटीज अवेरनेस इनिशिएटिव अवॉर्ड – 2026 नुकताच जाहीर करण्यात आला होता.त्याचे वितरण शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे भारतातील मधुमेह विषयात ज्यांचे भरीव कार्य आहे व ज्यांना मधुमेह विषयातील कामगिरी बाबत भारत सरकारचा पद्मश्री हा किताब मिळालेला आहे असे डॉ.शशांक जोशी व आंतरराष्ट्रीय डायबेटीज फेडरेशनच्या अध्यक्ष डॉ.निती पॉल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी देशभरातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मधुमेही तज्ञ डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.डॉ. अतुल शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्या गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची केलेल्या मोफत सेवेची पावती आहे अशी भावना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आहे. मराठवाडा विभागातून हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवणारे एकमेव मधुमेह तज्ञ डॉ . अतुल शिंदे हे एकमेव आहेत. अंबाजोगाई शहरात गेल्या 13 वर्षापासून आपल्या वैद्यकीय सेवेतून गोरगरीब व तळागाळातील आबाल वृद्ध व लहान वयातील मधुमेह रुग्णांना दिलासा देण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहे. वैद्यकीय सेवे सोबतच संशोधन, प्रशिक्षण व समाजाभिमुख उपक्रमांद्वारे असंख्य रुग्णांचे जीवनमान त्यांच्यामुळे उंचावले आहे.मधुमेहींच्या आरोग्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध व्यासपीठावरून प्रभावी मार्गदर्शन सातत्याने केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यातून समर्पण, उत्कृष्टता आणि समाजसेवेची प्रेरणा इतरांना मिळत असते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मराठवाडा विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, रुग्ण व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
