
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सोन्याचे दागिने, मोबाईल व 80 हजार रु. रोख रक्कम असलेली सापडलेली पर्स प्रामाणिक पणे पोलीस स्टेशनला जमा केल्या नंतर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अवघ्या एक तासात सदर पर्स ज्याची होती त्यांच्या कडे सुपूर्त करत गॅरेज चालक खलील रफिक शेख यांच्या प्रामाणिक पणा बद्दल सत्कार करण्यात आला.

या विषयी प्राप्त माहिती अशी की, आज दि. 17/02/2026 रोजी सायं. 16.30 वा. चे दरम्यान, किरमानी नगर दर्गा, चनई परिसरात गॅरेज चालक खलील रफिक शेख, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई यांना एक हरवलेली पर्स मिळून आली. या पर्समध्ये अंदाजे रुपये ₹75,000 ते ₹80,000 इतकी रोख रक्कम, एक मोबाईल फोन तसेच सोन्याचे दागिने असा मौल्यवान मुद्देमाल होता.
एवढा ऐवज असतानाही खलील रफिक शेख यांचं मन बहाळून न जाता त्यांनी प्रामाणिक पणे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्याशी संपर्क साधला व ही पर्स पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे जमा करण्यासाठी स्वतः हजर राहिले.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पर्समधील मोबाईलवर आलेल्या दूरध्वनीवरून चौकशी केली असता ही पर्स राधा ऋषिकेश पवार, रा. डोंगर पिंपळा यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जोगदंड यांनी पवार कुटुंबीयांना पोलीस स्टेशन येथे बोलावून, योग्य ती खातरजमा केली असता पर्स एक तासापूर्वी हरवली होती व ही पर्स लहान मुलांना टॉयलेटला बसवताना रस्त्याच्या कडेला विसरून ते निघून गेले होते.
ही खातर जमा केल्या नंतर सर्व मुद्देमाल पोलीसांच्या समक्ष त्यांच्या ताब्यात दिला आणि खलील रफिक शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी व कर्तव्यदक्षतेबद्दल पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. खलील शेख यांच्या या आदर्श कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून सर्वत्र त्यांच्या इमानदारीचे कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे नागरिकांना आवाहन
खलील शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणाच्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी. कोणतीही हरवलेली वस्तू मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून संबंधित मालकास परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.
