अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहरात जबरी चोरी करणाऱ्या चार तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी इसम इम्रान दस्तगीर शेख (वय 28, रा. होळ ता. केज) यांनी दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे तक्रार दिली. ते सानिका बिअर बार परिसरात उभे असताना तीन अनोळखी तरुणांनी “ऑनलाईन पैसे टाकतो” असे सांगून त्यांना दुचाकीवर बसवून आडस रोडकडे नेले. तेथे त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले. या प्रकरणी गु.र.नं. 48/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना अंबाजोगाई शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 1) सुमित अरुण गायकवाड (वय 19), 2) विजय गोविंद जगधने (वय 19), 3) विश्वजीत विश्वास गंडले (वय 18) व 4) शिवम जनक कसबे (वय 18, सर्व रा. अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढील तपास सुरू आहे.
