अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील शेतकरी कुटुंबातील युवक अजित जयसिंगराव देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाचा आनंद व्यक्त करत ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अजित देशमुख यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले. माकेगाव येथील प्रगतिशील शेतकरी जयसिंगराव देशमुख यांचे ते सुपुत्र असून अगदी कमी वयात गावातून पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
अजित देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण लातूर येथे पूर्ण केले. बालपणापासूनच हुशार, जिद्दी व चिकाटी असलेल्या अजित यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून अहोरात्र अभ्यास व मेहनत घेत अखेर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.
आपल्या आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे माकेगाव गावाचे नाव उज्ज्वल झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
