
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील रिंग रोडवरील तथागत चौक परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवरून जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात हलविण्यात आला असून संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
