अंबाजोगाई प्रतिनिधी :-
तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत धाबा चालकाला गावठी पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई १० एप्रिल २०२६ रोजी रात्री सोमनवाडी शिवारात पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास अंकुश चाटे हा आपल्या धाब्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
