बच्चू कडूंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने कार्यकर्त्याने घेतले विष.
अमरावती प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. पण, आंदोलनाची दखल अद्याप सरकारने घेतली नसल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
त्यातच शुक्रवारी प्रहारच्या एका पदाधिकाऱ्याने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. या पदाधिकाऱ्यावर वरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजय भागवतराव चौधरी (३५, रा. वरूड) असे विष प्राशन करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अजय चौधरी हे प्रहारचे वरूड तालुका संपर्क प्रमुख आहेत. बच्चू कडू यांच्या आदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने संतप्त होऊन चौधरी यांनी विष प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.