बीड

संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून व्यथित तरुणाचं टोकाचं पाऊल, धनंजय देशमुखांची तरुणांना भावनिक साद

बीड प्रतिनिधी  : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं नोव्हेंबर २०२४ मध्ये आधी अपहरण आणि नंतर त्यांची निर्घुण, अमानुषरित्या हत्या करण्यात आली. या घटनेनंतर केवळ बीडमध्येच नाही, तर संपूर्ण राज्यात संताप केला जात आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास ८० हून अधिक दिवस उलटून गेल्यानंतर ३ मार्च रोजी त्यांची हत्या करताचे आरोपींचे फोटो, संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो समोर आले. हे फोटो पाहून प्रत्येकजण हळहळला. संतोष भैय्या देशमुख यांना इतक्या क्रूरपणे मारहाण केल्यानंतरचे फोटो फोटो पाहून एका तरुणाला मोठा धक्का बसला. याच धक्क्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. बीडच्या केज तालुक्यातील जानेगाव येथे अशोक हरिभाऊ शिंदे, या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

संतोष देशमुख प्रकरणातील दोषारोप पत्रातील वायरल झालेले फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथील अशोक शिंदे हा तरुण प्रचंड अस्वस्थ, व्यथित झाला होता. त्याने या विषयावर गावातील मित्रांसोबत चर्चा केली. त्यानंतर तो घरी आला.

तसंच त्याने घरी येऊन आपल्या पुण्यात राहणाऱ्या बहिणीशी फोनवरही याबाबत चर्चा करुन संतोष देशमुख यांच्या फोटोवरुन हळहळ व्यक्त केली होती. मला टोकाचं पाऊल उचलावसं वाटत आहे असं तो बहिणीला फोनवर म्हणाला होता. मित्रांना घरी जाऊन येतो असं सांगून तो घरी आला, नंतर बहिणीशी बोलला आणि घरातच गळफास लावून आपली त्याने आपली जीवन यात्रा संपवली.

हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष भैय्यांच्या आठवणीत काल जानेगाव बंद ठेवण्यात आलं होतं. यावेळी आत्महत्या केलेला अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता. अशोक शिंदे यांची ही आत्महत्या नसून धनंजय मुंडेच्या गुन्हेगारी टोळीने केलेली हत्याच आहे, गुन्हेगारांचं क्रौर्य आणि संतोष देशमुख यांना झालेल्या यातना पाहूनच अशोक शिंदे विचलित झाला होता, त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याच्या संतप्त भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान, ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलं आहे. तसंच एक – एक मावळा जर या लढाईमध्ये कमी होत असेल, तर लढाई लढायची कशी? असा प्रश्न देखील धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!