*बीड जिल्ह्यातील लिमगाव खळवट येथे अंतराळातून पडले दोन दगड!*
बीड प्रतिनिधी:-
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड (Stone) पडल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील दगडाचे महत्त्व लक्षात घेता छत्रपती संभाजी नगर येथील अंतराळ संशोधन केंद्रातील वैज्ञानिकांनी या गावाला भेट देऊन हे दगड ताब्यात घेतले आहेत.
५ मार्च रोजी दुपारी घडली घटना
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील भिकाजी ज्ञानोबा अंबुरे या शेतकऱ्याच्या घरावर सोमवार ५ मार्च रोजी दुपारी एक मोठा दगड पडल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजाने सदरील शेतकरी व आजूबाजूचे लोक एकत्र येऊन आवाज कशाचा आला? काय पडले? याचा शोध घेवू लागले. सदरील लोकांनी संबंधित शेतकऱ्याच्य घरात जाऊन शोधाशोध केली असता त्यांना घराच्या पत्रात छिद्र पाडून एक साधारण २५० ग्रॅम वजनाचा काळा दगड त्याच्या घरात पडलेला दिसून आला.
या नंतर सदरील लोकांनी घराबाहेर ही शोधाशोध केली असता घरापासून काही अंतरावर तसाच एक दगड त्यांना आढळून आला.
एपीजी अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्रातील संशोधकांनी दिली भेट
या नंतर संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी या दगडासंदर्भात ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाला कळवले होते. दरम्यान, तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा करुन या दगडासंबंधिची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राला दिली. सदरील महिती कळताच या केंद्रातील अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले असल्याचे समजते.