बीड

धनंजय नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल! टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज!

बीड प्रतिनिधी: -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात तब्ब्ल तीन दिवस नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे बीड पोलीस थोबाडावर पडले आहेत. विधान परिषदेत प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी गपगुमान विक्रम मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल केला.

केज तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत नोकरीस असलेले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी धुलिवंदनच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या मृत्यूस संस्थाचालक विक्रम मुंडे, विजयकांत मुंडे, अतुल मुंडे आणि इतर जबादार असतील असे म्हटले होते.

या प्रकरणी कोणीच फिर्यादी नाही असे म्हणत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पोलीस अधीक्षक यांनी देखील नियमावर बोट ठेवत या गोष्टीची पाठराखण केली.

स्वतः जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील मस्तवाल पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही.

दरम्यान विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी या विषयावर आवाज उठवला. आ जितेंद्र आव्हाड, आ रोहित पवार यांनीही या विषयावर सरकारला जाब विचारला. त्यानंतर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.

या सगळ्या घटना घडामोडीनंतर सोमवारी रात्री उशिरा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीकांत घुले यांच्या तक्रारी वरून विक्रम मुंडे व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

डोळ्यासमोर एका व्यक्तीने आपला जीव दिलेला असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे कोणत्या नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते हे ण उलगडणारे कोडे आहे. अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने हालचाल करणे अपेक्षित आहे. मात्र खेडकर यांनी जी दिरंगाई केली आणि मस्तवाल पणा दाखवला तो अक्षम्य असाच आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!