बीड (प्रतिनिधी) आज मस्साजोग तालुका केज येथे नाम फाउंडेशन मार्फत नदी खोली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पोकलेनने कामाचा शुभारंभ झाला असून ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे गाव पाणीदार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न असून यातून गाव सधन होईल. गावकऱ्यांनी जास्तीत जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी जनआंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
मस्साजोग येथील तीन किलोमीटर परिसरातील नदी पात्र खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम नामच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कामाचा आज शुभारंभ झाला. दोन-तीन दिवसात दुसरी पोकलेन मशीन देखील गावात येणार आहे.
गावाच्या मध्यभागातून जाणारी नदी ही पाणीदार होणार आहे. यातून गाव समृद्ध होईल. धनंजय देशमुख, भागवत कदम जालिंदर देशमुख, तुषार देशमुख आणि इतरांबरोबर याबाबत चर्चा झाली. पावसाळा अजून लांब असल्यामुळे अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी कामासाठी उपलब्ध आहे. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पाणी अडवल्याने किती फायदा होतो, हे आता शेतकऱ्यांना समजले आहे. पाणी कोठेही साठले तरी परिसरात सर्वत्र पसरत असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न असेल, असेही ॲड. देशमुख यांनी म्हंटले आहे. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.