*बीड जिल्हा विकासाच्या प्रतीक्षेत दादांकडून ठोस आणि दीर्घकालीन निर्णयाची अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
बीड प्रतिनीधी: —
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा आज जिल्हा दौरा होत आहे. केवळ दौरा म्हणून नव्हे, तर हा दौरा बौडच्या प्रगतीच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरेल, अशी संपूर्ण जिल्ह्याला आशा आहे. गेल्या अनेक दशकांपासून औद्योगिक मागासलेपणाचा शिक्का पुसण्याची संधी अजितदादांकडे आहे, आणि त्यांची कार्यशैली पाहता त्यांनी हा संकल्प पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाहीत, असा विश्वास वाटतो.
बीड जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. शिक्षण पूर्ण करुनही अनेक युवक बेरोजगार आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, हैदराबादसारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बीड जिल्ह्यातही औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या पाहिजेत. मोठे प्रकल्प, मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क, स्टार्टअप हब आणि लघुउद्योगांचे केंद्र इथे तयार झाले पाहिजे. हे सगळे करणं अजितदादांच्या धाडसी निर्णयशक्तीला सहज शक्य आहे, आणि त्यांनी पुढाकार घेतला, तर बीडचाही कायापालट अटळ आहे. फक्त उद्योगच नव्हे, तर शिक्षणाच्या बाबतीतही बीड जिल्हा मागे आहे. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण सुविधा, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास केंद्रांची अत्यंत आवश्यकता आहे. भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी जिल्ह्यातील तरुणांना स्वतःच्या जिल्ह्यातूनच तयार होणं शक्य व्हावं, यासाठी आधुनिक शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण यांचा विस्तार होणं नितांत गरजेचं आहे. या दृष्टीने देखील पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.
कृषी हा जिल्ह्याचा कणा आहे. मात्र, सातत्याने असलेली पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी संकटात आहे. अजितदादांकडून शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शक धोरणं, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी होईल, अशीही अपेक्षा आहे.महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या घटकांसाठी विशेष प्रोत्साहनात्मक योजना आणल्या जातील, अशी खात्री आहे. कारण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याशिवाय जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे. यासाठी आर्थिक मदतीबरोबर मार्गदर्शन, बाजारपेठ जोडणी आणि उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे.
यावर्षी पुन्हा उन्हाळा जवळ आला आहे आणि बीडसारख्या जिल्ह्याला पाणीटंचाई नेहमीच भेडसावत असते. मात्र, यंदा ही वेळ येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जलव्यवस्थापन, टँकर यंत्रणा, धरण व तलाव साठा व्यवस्थापन आणि जलसंधारण मोहीम राबवली जाईल, हे अपेक्षित आहे. ज्या भागात टंचाईची भीती आहे, तिथे वेळीच उपाययोजना होतील, याची खबरदारी घेतली जाईल, असं दिसतं.याशिवाय, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, नागरी सुविधा, रस्ते आणि संपर्क यंत्रणा, डिजिटल कनेक्टिव्हिटी या सगळ्याचा विकासही अत्यावश्यक आहे. या गोष्टींसाठी भरीव निधीची तरतूद आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास आहे.अजितदादा पवार यांचा निर्णय घेण्याचा धाडसी आणि ठाम स्वभाव सर्वांना माहित आहे. त्यांनी एकदा संकल्प केला, की तो पूर्णत्वाला नेल्याशिवाय मागे हटत नाहीत. म्हणूनच, बीड जिल्ह्याला मागासलेपणाच्या ओळखीपासून मुक्त करून प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या हातात आहे आणि त्यांच्याच हातून हे घडेल, अशी संपूर्ण जिल्ह्याला प्रामाणिक अपेक्षा आहे.बीड जिल्ह्याच्या प्रगतीच्या वाटचालीचा नवा अध्याय त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सुरु होईल आणि बीड जिल्हा राज्याच्या विकासनकाशावर तेजस्वीपणे झळकेल, असा विश्वास प्रत्येक बीडकराच्या मनात आहे.
वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफिया या सह सर्वच क्षेत्रातील माफियांना मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा देतानाच कोणाच्याही पाया पडू नका, पाया पडण्यासारखे लोक राहिले नाहीत असा म्हणत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. बीडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. बीडमध्ये वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफिया, गुटखा माफिया, खंडणीखोर यांनी डोके वर काढले आहे. मात्र आपण पालकमंत्री आहोत त्यामुळे यापुढे हे चालू देणार नाहीत. या सगळ्या माफियांना मातीत घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. रस्त्याचे काम मंजूर झाल्यावर आधीचे फोटो, नंतरचे फोटो काढा, डेप्युटी इंजिनियर, एकझ्यूकीटिव्ह इंजिनियर यांना दाखवा. काम न करता बिल काढाल तर याद राखा, बोगस काम करणाऱ्यांना मातीत घालू असा ईशारा अजित पवार यांनी दिला. अलीकडच्या काळात हार तुरे, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्याची पद्धत वाढली आहे. हे करताना पाया पडण्याची पद्धत सुरु झाली आहे. मात्र पाया पडण्यासारखे पाय अन नेते राहिलेले नाहीत. माशांच्या पाया पडण्यापेक्षा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासारखे युगपुरुष आहेत. त्यांना अभिवादन करा. असाही सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.